breaking-newsमहाराष्ट्रराष्ट्रिय

प्रकाश आंबेडकरांकडे गाडी नाही, तर सिद्धेश्वर महाराज पॅनकार्डविना

उमेदरवारांकडून निवडणूक आयोगाला प्रतिज्ञापत्र

लोकसभा निवडणुकीच्या आखाडय़ात उतरलेल्या बहुतांश उमेदवारांची सांपत्तिक स्थिती सर्वसामान्य मतदारांचे डोळे दिपवून टाकणारी आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे,  खासदार आनंदराव अडसूळ, भावना गवळी यांच्यासारख्या गर्भश्रीमंत उमेदवारांच्या तुलनेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आणि सिद्धेश्वर महाराज हे दोघे मात्र काहीसे गरीब असल्याने स्पर्धेच्या निवडणुकीत मतदारांना आपलेसे करताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागू शकते.

सोलापूरच्या सिद्धेश्वर महाराजांकडे १० हजार रुपये किमतीची अँबेसिडर कार असून विशेष म्हणजे त्यांच्याकडे साधे पॅनकार्डही नाही. तर बहुजन वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्याकडेही स्वत:चे वाहन नसल्याचे त्यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यात राज्यातील अनेक बडय़ा नेत्यांचे राजकीय भवितव्य ठरणार आहे. आतापर्यंत उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांपैकी काही चर्चेतील उमेदवारांच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेतल्यास बहुतांश उमेदवार करोडपती आहेत. त्यातही अनेक उमेदवारांच्या सहचारिणीच पतीपेक्षा अधिक श्रीमंत असल्याचे दिसून येते.

पश्चिम महाराष्ट्रातील एक लक्षवेधी लढत म्हणून सोलापूर मतदारसंघातील लढतीकडे पाहिले जात आहे. काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे, भाजपचे डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात तेथे लढत होत आहे. प्रथमच  निवडणूक लढविणाऱ्या आणि अक्कलकोटच्या हिरेमठ संस्थानचे मठाधिपती असलेल्या महास्वामींकडे साधे पॅनकार्डही नाही. त्यांच्याकडे ५० हजारची रोखड, आणि साडे सहा लाखांची जंगम मालमत्ता आहे. तर दोन कोटी ७२ लाखांची स्थावर  मालमत्ता आहे. सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे दीड लाखाच्या रोखडीसह गाडय़ा, दागिने अशी १७ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता असून २० कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. तर प्रकाश आंबेडकर यांच्याकडे  सुमारे एक कोटींची जंगम आणि सव्वा कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. शिवाय तीन कोटींची वडिलोपार्जित संपत्ती आहे.

हातकणंगले मतदारसंघातून निवडणूक लढविणारे खासदार राजू शेट्टी यांच्यावर विविध आंदोलनातील तब्बल १५ खटले प्रलंबित असून त्यांची सव्वा कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता असून सात लाखांचे कर्ज आहे. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची स्थावर आणि जंगम अशी सुमारे ६० कोटींची संपत्ती असून  त्यांच्यावर तीन खटले प्रलंबित आहेत. तर अशोक चव्हाण यांच्यावरही आर्दशसह आणखी काही प्रकरणांत गुन्हे दाखल आहेत. सोने, हिरे असे दागदागिने, गाडय़ा, घरे अशी कोटय़वधी रुपयांची चव्हाणांची संपत्ती असून काँग्रेसचेच आणखी एक उमेदवार माणिकराव ठाकरे यांनी मुंबईतील वरळीमधील आलिशान शुभदा सोसायटीमधील एक हजार चौरस फुटाच्या घराची किंमत केवळ ४० लाख रुपये दाखविली आहे. ठाकरे यांच्याकडे दीड कोटींची स्थावर तर एक कोटींची जंगम मालमत्ता असल्याची माहिती प्रतिज्ञापत्रात देण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button