breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पोलीस प्रशासनाच्या लेखी आश्वासनामुळे संभाजी ब्रिगेडचा अर्धनग्न महामोर्चा तात्पुरता स्थगित

पिंपरी / महाईन्यूज

छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केल्याप्रकरणी श्री श्री रविशंकर यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याच्या निषेधार्थ पोलीस प्रशासन आणि राज्य सरकारच्या विरोधात संभाजी ब्रिगेडच्या वतीने पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते मंत्रालय मुंबईपर्यंत पायी चालत अर्धनग्न महामोर्चा काढण्याचे नियोजन केले होते. मात्र, पोलिसांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर संभाजी ब्रिगेडने हा मोर्चा तात्पुरता रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी केल्याप्रकरणी श्री श्री रविशंकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी सभाजी ब्रिगेडने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे केली आहे. कित्येक दिवस पाठपुरावा करून देखील गुन्हा दाखल करण्यास पोलिसांकडून टाळाटाळ केली जात आहे. पोलीस प्रशासन व राज्य सरकारच्या निषेधार्त संभाजी ब्रिगेडने पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते मुंबई मंत्रालय धडक अर्धनग्न मोर्चा काढण्याचे रविवारी (दि. 22) नियोजन केले होते. दरम्यान, आज पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिका-यांना लेखी आश्वासन दिले.

जानेवारी २०२० मध्ये श्री श्री रवीशंकर यांच्याकडून यु-ट्युबवर त्यांच्या अधिकृत पेजवर प्रसारित केलेला व्हीडिओ, कॅलेंडर तसेच विविध लेखांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास मांडून बदनामी केल्याचे पिंपरी-चिंचवडमधील संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना आढळून आले. गेल्या दहा ते अकरा महिन्यापासून विविध निवेदने, आंदोलने करूनसुद्धा पोलीस प्रशासनाने श्री श्री रवीशंकर व इतर दोषींवर गुन्हा दाखल केला नाही.

पोलिस प्रशासनाने संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सतिश काळे यांना लवकरात लवकर गुन्हा दाखल करू असे लेखी आश्वासन दिले आहे. यामुळे संभाजी ब्रिगेडने सदरचा अर्धनग्न महामोर्चा तात्पुरता स्थगित केला आहे. पोलिस प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनानुसार त्वरित कारवाई न केल्यास संभाजी ब्रिगेड यापेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर करेल. परंतु, छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी कधीही सहन केली जाणार नाही, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष विशाल तुळवे, उपाध्यक्ष सतिश काळे, कार्याध्यक्ष गणेश दहिभाते, संघटक विशाल जरे, कार्याध्यक्ष प्रमोदसिंह गोतारणे, संघटक ज्ञानेश्वर लोभे, लहू लांडगे, रशिद सय्यद, सतिश कदम, दीपक खैरनार तसेच सहभागी आंदोलन कर्त्यांनी दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button