breaking-newsपुणेमहाराष्ट्र

ससूनमधील व्हेंटिलेटरवर “रुग्णांचा’ ताण!

पुणे – ससूनसारख्या मोठ्या रुग्णालयात तुम्हाला एखाद्या वॉर्डमध्ये रुग्णांचे नातेवाईक हाताने व्हेंटिलेटरचे पंम्पिंग करून आपल्या रुग्णाला श्‍वासोच्छवास देताना दिसले, तर संताप आल्याशिवाय राहणार नाही. पण, ससूनमध्ये सध्या 72 व्हेंटिलेटर असूनही रुग्णांना “मॅन्युअल व्हेंटिलेटर’चा आधार द्यावा लागत असेल, तर या व्हेंटिलेटरलाच रुग्णांचा ताण आला आहे, असे खेदाने म्हणावे लागेल.

सध्या रुग्णालयात 72 व्हेंटिलेटर असून आणखी 14 मशीन्सची नव्याने खरेदी करण्यात येणार आहे. रुग्णांची संख्या जास्त असल्याने गरज असलेल्या रुग्णांना आम्ही हाताने पम्पिंग करुन श्‍वासोच्छवास पुरवणारे व्हेंटिलेटरही वापरतो. यात जर “सीएसआर’च्या माध्यमातून आणखी व्हेंटिलेटर मिळाले, तर यातून रुग्णांना चांगली सोय उपलब्ध करुन देणे शक्‍य होईल.
– डॉ. अजय तावरे, अधीक्षक, ससून सर्वोपचार रुग्णालय

ससूनमधील एका मृताच्या नातेवाईकाने दैनिक “प्रभात’कडे कैफियत मांडली. “ससूनच्या वॉर्ड क्रमांक 15 मध्ये सर्व पेशंटला आम्हाला हाताने व्हेंटिलेटरचा फुगा दाबून आमच्या रुग्णाला श्‍वासोच्छवास द्यावा लागत होता. यामुळे आम्हाला रात्रंदिवस रुग्णाजवळ बसून त्यांना ऑक्‍सिजन पुरवावा लागत होता,’ असेही त्यांनी सांगितले. “यामध्ये थोडाजरी हलगर्जीपणा झाला, तर तो थेट रुग्णाच्या जीवाशीही खेळ होत आहे’ असेही या नातेवाईकांनी म्हटले आहे.
दरम्यान याबाबत दैनिक “प्रभात’ने ससूनमधील व्हेंटिलेटरच्या संख्येचा आढावा घेतला असता तेथे मोठ्या प्रमाणावर इलेक्‍ट्रिक व्हेंटिलेटर असल्याचे सांगण्यात आले. ससूनमध्ये जितक्‍या प्रकारचे “आयसीयू’ अर्थात अतिदक्षता विभाग आहेत, त्या प्रत्येक ठिकाणी पुरेसे व्हेंटिलेटर उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले.
याबाबत माहिती देताना ससूनचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे म्हणाले, आमच्याकडे रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यामुळे व्हेंटिलेटर असूनही अनेकदा अपुरे पडतात. अशा वेळी आम्ही मॅन्युअल पंपिंग करता येणारे व्हेंटिलेटर देतो. त्याची संख्या पुरेशी असल्याने रुग्णांना त्याचा आधार मिळतो. तसेच “आयसीयू’मधील जागा जशा रिक्‍त होतील, त्याप्रमाणे आम्ही व्हेंटिलेटरची गरज असणाऱ्या रुग्णांना “आयसीयू’मध्ये दाखल करतो.

प्रत्येक “आयसीयू’मध्ये पुरसे व्हेंटिलेटर
मेडिकल “आयसीयू’मध्ये 26 खाटा असून त्यापैकी 14 जागांवर व्हेंटिलेटर आहेत. “ट्रॉमा आयसीयू’मध्ये 17 खाटा असून त्यापैकी 17 ठिकाणी व्हेंटिलेटर आहे, “सीटीसीव्हीएस आयसीयूमध्ये 13 खाटा आहेत व 10 व्हेंटिलेटर आहेत. तसेच “पल्मनरी मेडिसिन आयसीयू’मध्ये 6 खाटा असून 4 व्हेंटिलेटर आहेत. “पेडियाट्रिक आयसीयू’मध्ये 10 खाटा असून 17 व्हेंटिलेटर आहेत. त्यापैकी 5 बंद आहेत आणि “नियोनॉटल आयसीयू’मध्ये 75 खाटा असून 10 व्हेंटिलेटर आहेत, अशी माहिती डॉ. तावरे यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button