breaking-newsपुणे

हात उसणे घेतलेल्या पैशांच्या वादातून मित्राचा खून

पुणे – पैशांच्या वादातून तीक्ष्ण शस्त्राने वार करून मित्राकडून एका युवकाचा खून करण्यात आल्याची घटना हडपसर भागात घडली. या घटनेनंतर खून करणारा मित्र स्वत:हून हडपसर पोलीस ठाण्यात हजर झाला.

राहुल प्रल्हाद पाटील (वय २७, रा. तुकाईदर्शन, फुरसुंगी, हडपसर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी गौरव उदय पाटील (वय २१, रा. तुकाईदर्शन, फुरसुंगी, हडपसर) याला अटक करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांनी या संदर्भात हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल आणि गौरव मूळचे जळगावचे रहिवासी आहेत. गौरवने राहुलकडून ५० हजार रुपये हातउसने घेतले होते. दोघांमध्ये हात उसने घेतलेल्या पैशांवरून वाद झाला होता. सोमवारी रात्री दहाच्या सुमारास राहुल फुरसुंगी भागातील अंजना अपार्टमेंटसमोर थांबला होता. त्यावेळी गौरव तेथे आला. त्यांच्यात पुन्हा वाद झाला. गौरवने राहुलवर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच तो मरण पावला होता. राहुलचा खून केल्यानंतर आरोपी गौरव हडपसर पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याने मित्राच्या खुनाची कबुली दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी शिंदे तपास करत आहेत.

युवकाचा मृतदेह सापडला

सिंहगड रस्ता भागात फनटाईम चित्रपटगृहाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या कालव्याच्या परिसरात मंगळवारी सकाळी युवक मृतावस्थेत सापडला.  मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असून ओळख पटलेली नाही. खून झालेल्या युवकाचे वय अंदाजे २५ ते ३० वर्ष आहे. युवकाच्या डोक्यात दगड घालण्यात आला आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button