तेलुगू सुपरस्टार चिरंजीवी कोरोना पॉझिटिव्ह
हैदराबाद – टॉलिवूड अभिनेते चिरंजीवी यांना कोरोनाची लागण झाली आहे. बहुप्रतीक्षित ‘आचार्य’ या चित्रपटाच्या चित्रीकरणापूर्वी करण्यात आलेल्या चाचणीदरम्यान चिरंजीवी यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. याबाबत त्यांनी स्वतः आज ट्विटरवरून माहिती दिली आहे.
त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय, ‘मला कोरोनाची कोणतीही लक्षणे जाणवत नसून सध्या मी होम क्वारंटाईन आहे. मागील ५ दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कृपया स्वतःची कोरोना चाचणी करून घ्यावी. तसेच माझ्या प्रकृतीबाबत मी आपल्याला माहिती देत राहीन.’
दरम्यान, अभिनेते चिरंजीवी आणि अभिनेते नागार्जुन यांनी अलीकडेच प्रगती भवनात जाऊन तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांच्यात तेलंगणातील चित्रपटसृष्टीचा विकास आणि विस्ताराबाबत चर्चा झाली होती. तसेच यावेळी हैदराबाद पूरग्रस्तांसाठी चिरंजीवी यांनी एक कोटी रुपये आणि नागार्जुन यांनी ५० लाख रुपयांच्या मदतीचे चेकही मुख्यमंत्र्यांकडे सोपविले होते.