breaking-newsमुंबईराष्ट्रिय

पुलवामा घडले नसते तर भाजप ‘तीनशेपार’ पोहोचला असता काय?; शिवसेनेचा सवाल

बालाकोट येथील दहशतवाद्यांचा तळ सक्रिय झाल्याची माहिती लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी दिली. रावत यांच्या माहितीनंतर “उद्ध्वस्त केलेल्या ठिकाणी पुन्हा दहशतवादी कसे जन्म घेत आहेत,” असा प्रश्न शिवसेनेने उपस्थित केला आहे. “लोकसभा निवडणुकीच्यावेळी पुलवामा घडले. पुलवामा आणि बालाकोट हे भाजपच्या प्रचाराचे मुद्दे ठरले. पुलवामा घडले नसते तर भाजप ‘तीनशेपार’ पोहोचला असता काय?”असा सवाल शिवसेनेनं केला आहे.

‘पुलवामासारखी एखादी घटना घडली नाही तर महाराष्ट्रातील सत्तांतर अटळ आहे,’ असं मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी औरंगाबादमध्ये बोलताना व्यक्त केलं होतं. त्यानंतर लष्करप्रमुखांनी एअर स्ट्राईकमध्ये उद्ध्वस्त करण्यात आलेलं बालकोट येथील दहशतवाद्याचं तळ पुन्हा सक्रिय झाल्याची माहिती दिली. यावर शिवसेनेने ‘सामना’च्या अग्रलेखातून चिंता व्यक्त केली आहे. “लष्करप्रमुखांनी बोलायचे नसते, करून दाखवायचे असते, असा एक सैनिकी रिवाज आहे. देशाचे लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी चेन्नई मुक्कामी जाहीर केले आहे की, हिंदुस्थानी हवाई दलाने उद्ध्वस्त केलेला बालाकोट येथील दहशतवाद्यांचा तळ पुन्हा सक्रिय झाला आहे. या तळाची पाकिस्तानने फेरबांधणी केली असून तब्बल 500 अतिरेकी हिंदुस्थानी हद्दीत घुसण्याच्या तयारीत आहेत. अशी माहिती जाहीर करून आमच्या लष्करप्रमुखांनी काय साध्य केले? कश्मीरात काय चालले आहे याची माहिती अद्याप बाहेर दिली जात नाही. पण बालाकोटची हालचाल लष्करप्रमुखांनी समोर आणली आहे हे महत्त्वाचे. चार दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी टोला मारला होता की, ‘पुलवामासारखी एखादी घटना घडली नाही तर महाराष्ट्रातील सत्तांतर अटळ आहे.’ पवार यांचे हे विधान आश्चर्यकारक, तितकेच धक्कादायक म्हणावे लागेल. त्यावर भाजपने टीकेची झोड उठवली. पवारांच्या विधानानंतर लगेच लष्करप्रमुखांनी बालाकोटमधील दहशतवादी तळाची माहिती दिली. निवडणुका जवळ आल्या की बालाकोटचा मुद्दा कसा काय चर्चेत आणला जातो, लष्करप्रमुखांनी कुणाच्या राजकीय लाभासाठी विधाने करणे टाळावे, असे आता विरोधकांनी सुनावले आहे,” असं सांगत “लष्करप्रमुखांनी कुणाच्या राजकीय फायद्यासाठी हे विधान केले असावे असे आम्हाला वाटत नाही, पण राजकीय वातावरणाचा प्रभाव हा पडत असतो. सध्याचा माहोलच असा काही बनवला जात आहे की प्रत्येकजण एकाच प्रवाहात एकाच दिशेने सूर मारताना दिसत आहे,” असं मत शिवसेनेनं व्यक्त केलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button