पुण्यात मंडपाशिवाय होणार गणेशोत्सव, प्रमुख 50 मंडळांनी एकत्र येत घेतला निर्णय
पुणे- संपूर्ण जगासह देशात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव आहे. देशात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव महाराष्ट्रात आहे. त्यात मुंबई आणि पुणे या शहरांत कोरोनाबाधितांची संख्या सर्वात जास्त आहे. अशातच गणेशोत्सवही जवळ आला आहे. कोरोनामुळे गणेशोत्सव साजरा करण्यावरही सावट आल्याने पुण्यातील प्रमुख 50 मंडळांनी एकत्र येत गणेशोत्सव काळात मंडप न घालण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रमुख मंडळांनी घेतलेल्या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
गणेशोत्सव काळात पुण्यातील गणपती आणि सजावट पाहण्यासाठी दूरहून गणेशभक्त येत असतात. मात्र यंदा कोरोना महामारीचे संकट घोंगावत असल्याने गणेशोत्सव काळात होणारी लोकांची गर्दी टाळण्यासाठी पुण्यातील बाबू गेणू गणेश मंडळ, हत्ती गणपती गणेश मंडळासह 50 प्रमुख मंडळांनी सामाजिक भान राखत रस्त्यावर मंडप न घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी वर्षभर ज्या मंदिरांमध्ये किंवा छोट्या शेडमध्ये मूर्ती ठेवण्यात येते त्याच ठिकाणी छोट्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना, पूजा करण्यात येईल, अशी माहिती मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, याआधी प्रशासकीय पातळीवर झालेल्या बैठकांमध्ये गणेश मूर्तीच्या उंचीवर आणि उत्सवावर काही अटी घालून उत्सव साजरा करण्याचे आवाहन मंडळांना करण्यात आले होते.