अभ्यासक्रमातून कुलकर्णींचा पाठ वगळा, अन्यथा आंदोलन; संभाजी ब्रिगेडचा इशारा
पिंपरी – पुण्यातील बांधकाम व्यवसायीक डी. एस. कुलकर्णी यांनी हजारो सामान्य नागरिकांकडून पैसे गोळा करत करोडो रुपयांची फसवणूक केली आहे. अनेक बँकांना खोट्या कागदपत्रांद्वारे लाखो रुपयांचा आर्थिक गंडा घातला आहे. त्यांच्या विरोधात पोलिसांकडे अनेक तक्रारीही दाखल झालेल्या आहेत. आर्थिक फसवणुकीमुळे डी. एस. कुलकर्णी सह सर्व आरोपी अटक असुन जेलमध्ये बंद आहेत. त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत अभ्यासक्रमातून डी. एस. कुलकर्णी यांचा पाठ वगळावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.
यासंदर्भात पुणे विद्यापीठाचे उपकुलगुरू एन. एस. उमराणी यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी म्हटले आहे की, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे देशातील अग्रगण्य विद्यापीठ आहे. परंतु, विद्यापीठाअंतर्गत येणा-या सर्व महाविद्यालयात वाणिज्य शाखा पदवीच्या अभ्यासक्रमात यशोगाथा या पुस्तकात ‘वास्तु उद्योगातील अग्रणी डी. एस. कुलकर्णी’ असा धडा आहे, तो धडा विद्यापीठाने अभ्यासक्रमातून तात्काळ रद्द करावा, अन्यथा विद्यापीठासमोर संभाजी ब्रिगेड स्टाईलने आंदोलन करण्यात येईल आणि त्या ‘पुस्तकांची होळी’ केली जाईल, अशा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.