breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिका शिक्षण समिती सभापती पदासाठी सोनाली गव्हाणे यांचा अर्ज दाखल

पिंपरी – गेल्या एक वर्षापासून रखडलेल्या महापालिकेतील शिक्षण समिती स्थापनेचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर आता समिती सभापती पदासाठी भाजपच्या सोनाली गव्हाणे यांचा अर्ज दाखल झाला आहे. आज दुपारी गव्हाणे यांनी महापालिकेचे नगरसचिव उल्हास जगताप याच्याकडे अर्ज दाखल केला. यावेळी महापौर नितीन काळजे, पक्षनेता एकनाथ पवार, स्थायी सभापती ममता गायकवाड, उपमहापौर शैलजा मोरे, इ प्रभाग अध्यक्षा भीमाबाई फुगे, विधी समितीच्या माजी सभापती शारदा सोनवणे, शहर सुधारणा समितीचे माजी सभापती सागर गवळी, सुवर्णा बुर्डे, अॅड. मोरेश्वर शेडगे आदींच्या उपस्थितीत अर्ज दाखल करण्यात आला.

पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी शिक्षण समिती सभापतीपदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार आज गुरुवारी (दि. 5) दुपारी तीन ते सायंकाळी पाच या वेळेत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. सत्ताधारी भाजपकडून सोनाली गव्हाणे यांचा सभापतीपदासाठी तर उपसभापतीपदासाठी शर्मिला बाबर या दोघींचे अर्ज भरण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांची निवड निश्चित आहे. सभापती, उपसभापतीपदाची प्रत्यक्ष निवडणूक सोमवारी (दि. 9) दुपारी एक  वाजता होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पाचे संचालक सुशील खोडवेकर कामकाज पाहणार आहेत.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांशी निगडित असलेल्या शिक्षण मंडळाच्या कारभारात गैरव्यवहार होत असल्याची अनेक प्रकरणे समोर आली. त्याला पिंपरी-चिंचवड महापालिकाही अपवाद नाही. शिक्षण मंडळाच्या गैरव्यवहारामुळे अनेक वर्षे विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वेळेवर मिळाल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये नाराजी होती. त्याची दखल घेऊन केंद्र शासनाने राज्यातील सर्व महापालिकांमधील शिक्षण मंडळे बरखास्त करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शिक्षण मंडळ 2 जून 2017 रोजी बरखास्त करण्यात आले. त्याठिकाणी नऊ नगरसेवकांचा समावेश असलेल्या शिक्षण समितीची स्थापना नुकतीच करण्यात आली. त्यामध्ये संख्याबळानुसार नगरसेवकांना संधी देण्यात आली आहे. मुळात ही समिती स्थापन करण्यासाठी पालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या पदाधिका-यांनी एक वर्षाचा विलंब केला. त्यामुळे मंडळाचा कारभार प्रशासनाच्या हाती गेला. मंडळ बरखास्त झाल्याने त्याचे सर्वाधिकार आयुक्तांच्या कक्षेत होते. प्रशासनावर कसलाही दबाव नव्हता, त्यामुळे शिक्षण विभागाचा कारभार मनमानी प्रमाणे सुरू होता. अखेर आज समितीची स्थापना होऊन सभापती पदाचाही मुद्दा मार्गी लागत आहे.

शिक्षण मंडळावर 15 सदस्यसंख्या होती. त्यात घट होऊन समितीवर विविध विषय समित्यांप्रमाणे 9 नगरसेवकांची निवड झाली आहे.  त्यामध्ये भाजपकडून सोनाली गव्हाणे, सुवर्णा बुर्डे, शर्मिला बाबर, शारदा सोनवणे, संगीता भोंडवे तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून विनया तापकीर, राजू बनसोडे, उषा काळे आणि शिवसेनेकडून अश्विनी चिंचवडे यांची नुकत्याच झालेल्या महासभेत समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली. त्यापैकी सोनली गव्हाणे यांना समितीवर पहिली सभापती होण्याचा मान मिळणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button