breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

पुणे : नर्‍हे येथील नवले ब्रिजजवळ भीषण अपघातात ३ जण ठार

पुणे | प्रतिनिधी

मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर नर्‍हे येथील नवले ब्रिजजवळ वारंवार अपघाताच्या घटना घडत असून, अपघातांची मालिका सुरूच आहे. रविवारी सायंकाळी ट्रेलरने या महामार्गावरील नवले ब्रिजजवळ गावगाडा हॉटेलसमोर आठ वाहनांना जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

प्रशांत मधुकर गोरे (32, रा. उस्मानाबाद) आणि राजेंद्र मुरलीधर गाढवे (65, रा. आंबेगाव खुर्द) अशी अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत, तर रात्री उशिरा निखील विलास आवटे (वय २५, रा. कात्रज) या तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिस हवालदार अशोक कदम यांनी दिली. या प्रकरणात ट्रेलर चालक प्रेमराज राणाराम बिष्णोई (25, रा. खेडजडगी, जोधपूर, राजस्थान) यास अटक करण्यात आली.

मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरून एक बावीसचाकी ट्रेलर (आरजे 19 जीएफ 4673 ) एक्केचाळीस टन लोखंड घेऊन सातार्‍याहून अहमदाबाद येथे निघाला होता. यावेळी त्याचा ब्रेक फेल झाला. नंतर ट्रेलरने पेट घेतला. यामध्ये एकामागे एक असणार्‍या आठ गाड्या एकमेकांवर आदळल्या. चारचाकी गाड्यांचा अक्षरशः चुराडा झाला आहे. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला. ट्रकचा पुढचा टायर फूटल्याने 500 मीटर अंतरावर थांबला. दरम्यान, ट्रकच्या केबिनखाली आगही लागली. अपघाताची माहिती समजताच सिंहगडरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक देविदास घेवारे, गुन्हे निरीक्षक प्रमोद वाघमारे, तसेच सहायक पोलिस निरीक्षक बालाजी साळुंके यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच सिंहगड वाहतूक विभाग, तसेच अग्निशमनच्या गाड्या दाखल झाल्या. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. नवले ब्रिजजवळ भीषण अपघात, आठ वाहने एकमेकांना धडकली अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या साह्याने बाजूला काढण्यात आली. अपघात इतका भीषण होता की, रिक्षा, दुचाकी, कारचा अपघातात चुराडा झाला. रिक्षाचालक जागीच ठार झाला. अन्य दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिघा गंभीर जखमींवर उपचार सुरू आहेत. अपघातग्रस्तांना तत्काळ नवले आणि ससून रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले असून जखमींवर तत्काळ उपचार सुरू करण्यात येत असल्याचे वरिष्ठ निरीक्षक घेवारे यांनी सांगितले.

केव्हा थांबणार अपघाताचे सत्र?

गेल्या काही दिवसांपासून मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर अपघातांचे सत्र सुरू आहे. बुधवारी (दि. 25) पहाटे बाह्यवळण मार्गावर स्वामीनारायण मंदिरासमोर आठ वाहने एकमेकांवर आदळली होती. अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले होते. यावेळी जीवितहानी टळली होती. तीव्र उतार धोकादायक बाह्यवळण मार्गावरील दरी पूल ओलांडल्यावर सिंहगड रस्ता भागातील नर्‍हे परिसरापर्यंत तीव्र उतार आहे. दरी पूल ओलांडल्यानंतर भरधाव वेगाने येणार्‍या अवजड वाहनचालकांचे नियंत्रण सुटते. बर्‍याचदा या भागात अवजड वाहनांचे ब्रेक निकामी असल्याने व या भागात गंभीर दुर्घटना घडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. राष्ट्रीय महामार्ग झाल्यापासून अपघातात शंभरहून अधिक जणांचा बळी गेल्याचे आजवर घडलेल्या घटनांवरून समोर आले आहे. महिनाभरात घडलेला हा चौथा अपघात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button