breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

WTC Final Day 5 : भारताकडे ३२ धावांची आघाडी

साऊथम्पट – वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम लढतीच्या पाचव्या दिवसअखेर भारताने न्यूझीलंडसमोर ३२ धावांची आघाडी घेतली आहे. भारताने आपल्या दुसऱ्या डावाची सुरुवात केली असून संघाने ३० षटकात २ बाद ६४ अशी धावसंख्या उभारली आहे. आता उद्या म्हणजे राखीव दिवसाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा विजेता कोण असणार याचे चित्र स्पष्ट होणार आहे.

काल सामन्याच्या सुरुवातीला टॉम लॅथम आणि डेव्हॉन कॉन्वे यांनी न्यूझीलंडच्या फलंदाजीला आणि पहिल्या डावाला सुरुवात केली. इशांत शर्माने भारताकडून पहिले षटक टाकले. चहापानानंतर लॅथम-कॉन्वे यांनी २७व्या षटकात न्यूझीलंडचे अर्धशतक फलकावर लावले. खेळपट्टीवर स्थिरावलेला न्यूझीलंडचा सलामीवीर टॉम लॅथमला अश्विनने माघारी धाडले. लॅथमने ३० धावा केल्या. लॅथम आणि कॉन्वेने पहिल्या गड्यासाठी ७० धावांची भागीदारी केली. चांगल्या लयीत असलेल्या डेव्हॉन कॉन्वेने आपले ४४व्या षटकात आपले अर्धशतक पूर्ण केले. भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने कॉन्वेला माघारी धाडत न्यूझीलंडला दुसरा धक्का दिला. मोहम्मद शमीने कॉन्वेचा झेल टिपला. कॉन्वेने १५३ चेंडूचा सामना करत ६ चौकरांसह ५४ धावांची खेळी केली. त्याच्यानंतर कर्णधार केन विल्यमसनची साथ देण्यासाठी रॉस टेलर मैदानात आला. पाचव्या दिवशी मोहम्मद शमीने भारताला लवकर यश मिळवून दिले. टेलर वैयक्तिक ११ धावांवर झेलबाद झाला. शुबमन गिलने टेलरचा झेल घेतला. त्यानंतर इशांत शर्माने हेन्री निकोलसला स्लीपमध्ये उभ्या असलेल्या रोहित शर्माकरवी झेलबाद करत न्यूझीलंडला चौथा धक्का दिला. निकोलसने ७ धावा केल्या. कारकिर्दीची शेवटची कसोटी खेळणाऱ्या बीजे वॉटलिंगही पहिल्या डावात काही खास करू शकला नाही. मोहम्मद शमीने त्याचा एका धावेवर त्रिफळा उडवला.

दरम्यान, भारताने ८०व्या षटकानंतर नवा चेंडू घेतला. उपाहारानंतर मोहम्मद शमीने न्यूझीलंडला अजून एक हादरा दिला. शमीने त्याने कॉलिन डी ग्रँडहोमेला माघारी धाडले. त्यानंतर मैदानात आलेल्या काईल जेमीसनने झटपट २१ धावा काढल्या. मात्र तोही शमीचा बळी ठरला. ८९व्या षटकात न्यूझीलंडने आपले द्विशतक पूर्ण केले. कर्णधार केन विल्यमसनने न्यूझीलंडची एक बाजू लावून धरली. तब्बल १७७ चेंडूंचा सामना करत खेळपट्टीवर ठाण मांडून बसलेल्या विल्यमसनला इशांत शर्माने बाद केले. विल्यमसनने ६ चौकारांसह ४९ धावांची खेळी केली. टिम साऊदीने ३० धावांची खेळी करत संघसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. फिरकीपटू रवींद्र जडेजाने ३० धावांची खेळी केलेल्या टिम साऊदीचा त्रिफळा उद्ध्वस्त करत न्यूझीलंडचा पहिला डाव २४९ धावांवर संपुष्टात आणला. भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक ७६ धावात ४ बळी घेतले. तर इशांत शर्माने ३, जडेजाने २ आणि अश्विनने १ बळी घेतला.

तर रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी भारताच्या दुसऱ्या डावाची सुरुवात केली. टिम साऊदीने भारताला पहिला धक्का देत शुबमन गिलला माघारी धाडले. साऊदीने गिलला वैयक्तिक ८ धावांवर पायचित पकडले. गिल बाद झाल्यानंतर चेतेश्वर पुजारा मैदानात आला. रोहित आणि चेतेश्वरने २६व्या षटकात भारताचे अर्धशतक फलकावर लावले. साऊदीने भारताला दुसरा धक्का देत रोहित शर्माला माघारी धाडले. रोहितने ३० धावांची खेळी केली. रोहित बाद झाल्यानंतर कर्णधार विराट आणि चेतेश्वर पाचवा दिवस संपेपर्यंत नाबाद राहिले आहेत. विराट ८ तर चेतेश्वर पुजारा १२ धावांवर नाबाद आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button