संघाविषयी मुस्लिमांविषयीचे गैरसमज दूर करणार
लखनौ – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी मुस्लिमांचे जे गैरसमज आहेत ते दूर करण्याचा प्रयत्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुरस्कृत मुस्लिम राष्ट्रीय मंचाने करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी या संघाने नवी दिल्लीत ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्याखेरीज या मंचाने दोन हजार मुस्लिम मुलांच्या शिक्षणासाठी मदत करण्याचे ठरवले आहे. त्या खेरीज तलाक मिळालेल्या महिलेला दरमहा एक हजार रूपये पेन्शन देण्याचा निर्णयही राष्ट्रीय मुस्लिम मंचाने घेतला आहे.
मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे राष्ट्रीय निमंत्रक मुहंमद अफजल यांनी सांगितले की नवी दिल्ली येथे 19 जूनला होणाऱ्या ईद मिलन कार्यक्रमात आम्ही सर्व मुस्लिम मौलवींना निमंत्रण देणार आहोत. त्याखेरीज विविध देशांचे राजदूत आणि पाहुण्यांनाही त्यासाठी निमंत्रीत केले जाणार आहे. केवळ दिल्लीच नव्हे तर देशाच्या अन्य भागातही अशा प्रकारच्या ईद मिलन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे अशी महितीही त्यांनी दिली.