breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी ते दापोडी जूनमध्ये धावणार मेट्रो

पिंपरी |महाईन्यूज|

शहरातील मेट्रो कार्यान्वित होण्यासाठीचा २०२० चा मुहूर्त कोव्हिड-१९च्या प्रादुर्भावामुळे पुढे गेला असला, तरी पुढील वर्षी जून आणि ऑगस्टमध्ये पिंपरीसह पुण्यातील प्रवाशांना मेट्रोतून सफर करायला मिळणार आहे. पिंपरी ते दापोडी हा संपूर्ण आठ किमीचा मार्ग जून २०२१ पर्यंत कार्यान्वित केला जाणार आहे. त्यानंतर १५ ऑगस्टपर्यंत वनाझ ते गरवारे कॉलेज हा पुण्यातील मार्ग सुरू होणार आहे.

महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (महामेट्रो) सुरुवातीला केलेल्या नियोजनानुसार पुणे आणि पिंपरीतील प्राधान्य मार्गांवर प्रत्येकी दोन स्टेशन कार्यान्वित केली जाणार होती. या नियोजनात बदल करून आता प्राधान्य मार्गांवरील सर्व स्टेशन सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे संकेत ‘महामेट्रो’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले. त्यामुळे संत तुकारामगर ते फुगेवाडीऐवजी आता पिंपरीतील नागरिकांना पिंपरी-चिंचवड महापालिकेपासून दापोडीपर्यंतचा प्रवास पुढील वर्षीपर्यंत करणे शक्य होणार आहे; तसेच पुण्यातील नागरिकांनाही आनंदनगर ते गरवारे कॉलेजऐवजी वनाझपासून गरवारे कॉलेजपर्यंत पोहोचणे शक्य होणार आहे.

‘महामेट्रो’कडून सध्या या दोन्ही मार्गांवर वेगाने काम सुरू आहे. संत तुकारामनगर आणि फुगेवाडी ही दोन्ही स्टेशनची कामे अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत. पिंपरी-चिंचवड, भोसरी, कासारवाडी आणि या मार्गांवरील इतर स्टेशनच्या कामांना आगामी काळात गती दिली जाणार आहे. या मार्गांवरील ‘महामेट्रो’ची पहिली दोन स्टेशन येत्या वर्षअखेरीपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने पुढील स्टेशनची कामे पूर्ण केली जाणार आहेत. पिंपरीप्रमाणे पुण्यातील कर्वे आणि पौड रस्त्यावरील सर्व स्टेशन पुढील वर्षी ऑगस्टपर्यंत कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. सद्यस्थितीला आनंदनगर, गरवारे कॉलेज या दोन स्टेशनचे काम इतर स्टेशनपेक्षा अधिक झाले आहे. मात्र, यापुढील काळात वनाझ, आयडियल कॉलनी आणि नळस्टॉप या तीन स्टेशनची कामे सुरू करण्यात येणार आहेत.

तीन ट्रेन जूनपर्यंत पुण्यात?

पुणे मेट्रो प्रकल्पासाठी इटली येथील टिटागढच्या कारखान्यात ट्रेन बांधणीचे काम सुरू झाले आहे. येत्या दोन महिन्यांत या ट्रेनच्या चाचणी घेण्यासाठी ‘महामेट्रो’ची टीम इटलीला जाणार आहे. पुढील वर्षी जूनपर्यंत तीन ट्रेन सेट (मेट्रोचे नऊ डबे) भारतात दाखल होणार आहेत. त्यामुळे नागपूरहून मागविलेल्या ट्रेन सेटद्वारे मेट्रो सुरुवातीला कार्यान्वित झाली, तरी त्यानंतर पुण्यासाठीच्या बनविण्यात आलेल्या अॅल्युमिनियम बांधणीच्या ट्रेनमधूनच पुणेकरांना मेट्रोतून प्रवासाचा आनंद लुटता येणार आहे.

८ किमी : पिंपरी-चिंचवड ते दापोडी

४.५ किमी : वनाझ ते गरवारे कॉलेज

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button