Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

संदीप देशपांडे अखेर १६ दिवसांनी अवतरले; ‘शिवतीर्थ’वर घेतली राज ठाकरेंची भेट

मुंबई : मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना गुरुवारी सत्र न्यायालयाने काही अटी-शर्थींसह अटकपूर्व जामीन मंजूर केला. न्यायालयाकडून मिळालेल्या या दिलाशानंतर आज सकाळी संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे दोघेही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या ‘शिवतीर्थ’ येथे दाखल झाले. या दोन्ही नेत्यांनी राज ठाकरे यांची भेट घेत चर्चा केल्याची माहिती आहे.

शिवाजी पार्क पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे गेल्या अनेक दिवसांपासून गायब होते. पोलिसांनी त्यांना अटक करण्यासाठी पथकही तयार केले होते. मात्र ते पोलिसांच्या हाती लागत नव्हते. या दोघांनीही अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. अखेर काल या दोघांनाही अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आणि त्यांच्या डोक्यावरील अटकेची टांगती तलवार दूर झाली.

काय होता पोलिसांचा आरोप?

‘राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानाबाहेर पोलिसांकडून धरपकड होण्याची शक्यता लक्षात घेऊन देशपांडे व धुरी यांनी आपल्या वाहनात बसून पलायन केले. वाहनचालकाने वाहन अचानक पळवल्याने धक्का लागून एक महिला पोलीस खाली पडली आणि जखमी झाली. देशपांडे, धुरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी हेतूत: हे कृत्य केले’, असा आरोप पोलिसांनी केला होता. शिवाजी पार्क पोलिसांनी या प्रकरणी देशपांडे यांच्यासह अन्य आरोपींविरोधात भादंविच्या कलम ३५३ (सरकारी कर्मचाऱ्याला कर्तव्य करण्यापासून बलपूर्वक रोखणे), २७९ (उतावीळपणे वाहन चालवणे) व ३३६ (दुसऱ्याच्या जिवाला धोका निर्माण करणे) अन्वये एफआयआर दाखल केला.

दरम्यान, देशपांडे यांना पलायन करण्यास मदत केल्याबद्दल त्यांचे वाहनचालक रोहित वैश्य तसेच, शाखा अध्यक्ष संतोष साळी यांना पोलिसांनी अटकही केली होती. या दोघांनी जामीन मिळण्यासाठी अर्ज केले होते, तर देशपांडे व धुरी यांनी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज केले होते. त्याविषयीच्या सुनावणीअंती न्यायालयाने त्यांचे अर्ज मंजूर केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button