breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापाैरांचा लवकरच घेणार राजीनामा ?

चिंचवडमधील इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांला मिळणार संधी

पिंपरी –  महापालिकेतील भारतीय जनता पार्टीचे महापौर नितीन काळजे व सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांना बदलण्याच्या हालचाली सुरू आहेत. महापाैर पद हे इतर मागास प्रवर्गासाठी राखीव असल्याने त्यावर सव्वा-सव्वा वर्षे अन्य एकाला महापाैरांना संधी मिळणार आहे. त्यादृष्टीने येत्या आठवड्यात मुंबईत लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्यासोबत शहरातील भाजपच्या ‘कोअर कमिटी’ची बैठक होणार आहे. दरम्यान, पुढील आठवडाभरात महापाैरांचा राजीनामा घेण्यात येणार असून महापाैर निवडणुकीच्या अनुषंगाने 11 जूनची सर्वसाधारण सभाही पुढे ढकलण्यात येणार आहे, अशी माहिती विश्‍वसनीय सुत्रांनी दिली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काॅंग्रेसची सत्ता उलथवून भारतीय जनता पार्टीने सत्ता हस्तगत केली आहे. महापालिकेत 128 नगरसेवकांपैकी भाजपाचे 77, राष्ट्रवादीचे 36, शिवसेनेचे 9, अपक्ष 5 आणि मनसेचा 1  एवढे नगरसेवकांचे संख्याबळ आहे. महापालिकेत भाजपची सत्ता एकहाती आल्यानंतर महापाैर भोसरीचा की चिंचवडचा यावरुन पक्षात अनेक खलबते झाले होते. त्यावेळी पहिल्याच वर्षी आमदार महेश लांडगे गटाचे व ग्रामीण भागातील नितीन काळजे यांची अनपेक्षितपणे वर्णी लागली. याप्रसंगी आमदार लांडगे यांनी धक्कातंत्राचा अवलंब केला होता. परंतु, मागील आठवड्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील भाजपची सत्ता असलेल्या महापालिकेतील महापौर बदलणार असल्याचे सुतवाच केले होते.

दरम्यान, महापौर व पक्षनेते बदलाबाबत मागील काही दिवसांपूर्वी आमदार लक्ष्मण जगताप व आमदार महेश लांडगे यांची मुख्यमंत्र्यांसमवेत प्राथमिक चर्चा झाली होती. त्यानंतर याबाबत भाजप शहर ‘कोअर कमिटी’सोबत मुख्यमंत्र्यांनी दि. 21 मे रोजी मुंबईत बैठक ठेवली होती. परंतु; पालघर लोकसभेच्या प्रचारसभेमुळे मुख्यमंत्र्यांनी ती बैठक पुढे ढकलली. त्यामुळे येत्या आठवड्यात ही बैठक होणार आहे. त्यामुळे भाजपमधील विविध गटांमध्ये हालचालींना वेग आला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौरपद इतर मागासवर्गीय संवर्गासाठी अडीच वर्षांसाठी राखीव आहे. परंतू, महापालिकेत भाजपने महापाैर पदावर सव्वा-सव्वा वर्षांसाठी दोन महापौर वर्णी लावण्याची शक्यता आहे. महापौर पदासाठी आमदार महेश लांडगे गटाचे नगरसेवक राहुल जाधव, संतोष लोंढे तर आमदार लक्ष्मण जगताप गटाचे नगरसेवक शत्रुघ्न काटे, नामदेव ढाके आदीं इच्छुक आहेत.

दरम्यान, महापालिकेत सत्तारुढ पक्षनेते पदावर कोणाला संधी द्यायची, याबाबत अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. तसेच विरोधी पक्षनेते पदावर दत्ता साने यांच्या सारखा आक्रमक चेहरा राष्ट्रवादीने दिल्याने पक्षनेते पदावर त्यांच्या तोडीस तोड देणारा चेहरा भाजपला द्यावा लागणार आहे. त्यामुळे भाजपकडे सध्यस्थितीत एकनाथ पवार यांच्याशिवाय पर्याय नाही. परंतू, आमदार लांडगे गटाकडून पवारांना विरोध होण्याची शक्यता आहे. महापाैर पद चिंचवडकडे गेल्यास पक्षनेते  पदावर भोसरीतील नगरसेवकांकडून दावा सांगितला जाणार असल्याची चर्चा आहे.

……………………..

 आमदार लांडगेची आझमभाईंसोबत खलबते सुरु 

आमदार महेश लांडगे गटाचे महापाैर नितीन काळजे यांचा सव्वा वर्षांचा कालावधी पुर्ण झाला आहे. त्यादृष्टीने भाजपच्या कोअर कमिटीतून महापाैर बदलासह सभागृह नेता बदलाच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. त्या अनुषंगाने महापाैर पद पहिल्यांदा धक्कातंत्राचा वापर करुन लांडगे गटाकडे ठेवले होते. त्यामुळे स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणूकीत सलग दुस-या वर्षीही  आमदार लक्ष्मण जगताप यांनी आमदार लांडगे गटाला डावलून स्थायीचे सभापती पद स्वतःच्या गटाकडे ठेवले. तसेच भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांच्याशी भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांची चांगलीच जवळीकता वाढली आहे. माजी आमदार विलास लांडे हे भाजपचे सहयोगी आमदार महेश लांडगे यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत. त्यामुळे भोसरी विधानसभा मतदार संघात भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांची विरोधी आमदारांशी असलेल्या मैत्रीपुर्ण संबंधामुळे आमदार लांडगे गटात चांगलेच वादळ उठले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीसह महापालिकेत महापाैर पदासाठी आता कोणते डावपेच आखायचे, कोणता डाव टाकायचा, यावर आमदार महेश लांडगे गटाच्या बैठकीत चर्चा-खलबते सुरु आहेत. तसेच आमदार महेश लांडगे हे माजी महापाैर आझमभाई पानसरे यांना गुरुस्थानी मानतात. त्यामुळे राजकीय डावपेच खेळताना आमदार लांडगे सतत आपल्या गुरुशी चर्चा करुन सल्लामसलत करीत असतात. त्यानूसार गेल्या दोन दिवसापासून आमदार लांडगे यांच्या बैठका सुरु आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

 

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button