breaking-newsपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कनिष्ठ अभियंत्यांची पुण्यातील ड्यूटी रद्द करा : नगरसेविका सीमा सावळे

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी

पुणे शहरातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कनिष्ठ अभियंत्यांची ड्युटी म्हणजे एक प्रकारे ‘द्रविडी प्राणायाम’ आहे. पिंपरी चिंचवड शहरातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे, अशा परिस्थितीत हा अत्यंत चुकिचा निर्णय घेऊन प्रशासन स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेत आहे. किमान शहरातील कनिष्ठ अभियंत्यापुरता तत्काळ हा आदेश मागे घेण्याची विनंती भाजपाच्या ज्येष्ठ नगरसेविका सिमा सावळे यांनी केली आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे मागणी केली.

 याबाबत आयुक्त श्रावण हर्डिकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाचे पुणे शहरातील नियंत्रण हाताबाहेर गेले आहे. तिथे महापालिका प्रशासन त्यांच्या पध्दतीने जोमाने प्रयत्न करत आहे. पिंपरी चिंचवड शहरात राहणाऱ्या कनिष्ठ अभियंत्यांनी रोज पुणे शहरात जाऊन कोरोना नियंत्रणासाठी मदत करणे म्हणजे एक प्रकारचा द्रविडी प्राणायाम आहे. त्यांच्या रोजच्या ये-जा करण्यामुळे त्यांच्या जीवाला आणि त्यांच्या कुटुंबालाही धोका संभवतो. उलटपक्षी हेच कनिष्ठ अभियंते पिंपरी चिंचवड शहरासाठी कोरोनाचे वाहक ठरतील आणि जिथे परिस्थिती पूर्णतः नियंत्रणात आहे त्या `पिंपरी चिंचवडचे काम आणखी बिघडेल. त्यासाठी किमान पिंपरी चिंचवड महापालिका सेवेतील कनिष्ठ अभियंत्याना लावलेली ड्युटी रद्द करण्याची विनंती जिल्हाधिकारी यांना करावी.

पिंपरी चिंचवड शहरात पाणी पुरवठा आणि ड्रेनेज दुरुस्ती देखभालीच्या तक्रारी सतत सुरू असतात. कोरोनाच्या आपत्तीमध्ये कनिष्ठ अभियंते ते काम अगदी चोखपणे बजावत आहेत. त्यामुळे गेल्या दीड महिन्यांत एकही तक्रार आलेली नाही. शहरात अगोदर कोरोनाच्या कामात व्यस्त असलेल्या कनिष्ठ अभियंत्यांना पुन्हा तिसरेच काम आणि तेही पुणे शहरात दिल्यास दैनंदिन पाणीपुरवठा, ड्रेनेजसह देखभाल दुरुस्तीच्या कामांवर परिणाम संभवतो, अशी भिती सावळे यांनी व्यक्त केली आहे.

पुणे शहरातील कोरोनाचा प्रसार रोखला पाहिजे यात दुमत नाही. त्यासाठी सर्वांचे सहकार्य हवे जिथे शक्य आहे तिथे पिंपरी चिंचवडकरही हातभार लावतील. आजच्या परिस्थितीत पुणे शहरात राज्य सरकारच्या विविध विभागांत काम करणारे बहुतांश अधिकारी, कर्मचारी पुणे शहरातच वास्तव्याला आहेत. राज्याचा पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम खाते, रस्ते विकास महामंडळ, म्हाडा, एसआरए, महावितरण, एमआयडीसी, एमपीसीबी, कृषी, सहकार आदी खात्यांचे अधिकारी-कर्मचारी पुणे शहरात वास्तव्याला आहेत. खरे तर, त्यांना हे जादाचे काम सोपविले पाहिजे, असेही सावळे यांनी सुचवविले आहे. कोणत्याही परिस्थीतीत पिंपरीचे कनिष्ठ अभियंते पुणे शहरात पाठवू नका, अशी कळकळीची विनंती सावळे यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button