breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडाराजकारणराष्ट्रिय

‘त्या’ मृतांची व्यथा! कंत्रादाराकडून शोषण, उपासमारीमुळे धरला होता घराचा रस्ता, पण…

देश सध्या करोनाला हद्दपार करण्यासाठी लढत असताना दुसरीकडं अनेक मन व्यथित करणाऱ्या घटना घडत आहेत. लॉकडाउनमुळे रोजगार गेला. हाताला काम नसल्यानं उपासमार आणि आजाराच्या भीतीनं अनेक कामगार घराचा रस्ता धरत आहेत. परिस्थिती आणि भूकेच्या कात्रीत सापडलेल्या मजुरांनी घराचा रस्ता धरला, पण मालवाहू रेल्वे काळरात्र होऊन आली. यात तब्बल १६ जणांचा जीव गेला. या घटनेनंतर आता या कामगारांची व्यथा समोर आली आहे. मृतांच्या कुटुंबीयांनी या घटनेला कंत्राटदाराला जबाबदार ठरवलं आहे.

औरंगाबाद-जालना रेल्वे मार्गावर गाडेजळगाव नजिक शुक्रवारी पहाटे देशाला हादरवणारी घटना घडली. रेल्वे रुळावर झोपलेल्या १६ मजुरांना भरधाव मालवाहू रेल्वेनं गाडीनं चिरडलं. त्यानंतर अवघा देश सून्न झाला. मात्र, या घटनेनंतर अनेक गोष्टी समोर येऊ लागल्या असून, कंत्राटदारामुळेच मजुरांना घराचा रस्ता धरण्याची वेळ आली, असा आरोप मृतांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

अपघातातील मजुरांचे मृतदेह शनिवारी त्यांच्या गावी पोहोचले. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या कुटुंबीयांनी कंत्रादाराविरोधात आपला रोष व्यक्त केला. या मजुरांना कुटुंबीयांनी घरी न येता कामाच्या ठिकाणीच थांबण्याचा सल्ला दिला होता. पण, कंत्राटदारामुळे त्यांना घरी जाण्याचा निर्णय घ्यावा लागला. मृतांपैकी उमरिया जिल्ह्यातील पाच मजुरांचे कुटुंबीय म्हणाले की, “कंत्राटदारानं मजुरांना घरी जाण्यास मजबूर केलं. त्यांच्याकडे पैसे नव्हते. जेवणाचीही हेळसांड सुरू होती. कंत्राटदारानं पैसेच दिले नाही. पैसे मागितल्यावर त्याने बँक खाते क्रमांक दिला. त्यानंतर मजुरांनी आम्हाला पैसे पाठवण्यास सांगितलं. आम्ही त्यांना पैसे पाठवले. एका मजुराच्या पत्नीनं मोहाचे फुलं विकून आलेले ५०० रुपये खात्यात जमा केले. तर एका महिलेनं बचत गटातून १००० रुपये काढून पतीला पाठवले. अशाच प्रकारे इतरांनीही जुळवाजुळव करून हजार पाचशे रुपये खात्यावर जमा केले होते. त्यातूनही कंत्राटदारानं ५०० रुपयापर्यंत पैसे कापून घेतले. गेल्या महिन्याचा पगारही देण्यात आला नसून, स्टील कंपनीकडून कोणतीही मदत करण्यात आलेली नाही,” असं सांगताना कुटुंबीयांच्या अश्रूंचा बांध फुटला.

उमरियाचे जिल्हाधिकारी स्वरोचिश सोमवंशी यांनी काही मृतांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. “या घटनेचा अहवाल उप विभागीय दंडाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येणार असून, त्यानंतर उपविभागीय दंडाधिकारी कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची शिफारस करणार आहेत. यासंदर्भात औरंगाबाद जिल्हा प्रशासनाशी चर्चा सुरू असून, बँकेलाही उपविभागीय अधिकारी भेट देणार आहे. कंत्राटदारावर अॅट्रॉसिटी अॅक्टनुसारही गुन्हा दाखल करण्याची शिफारस केली जाणार आहे,” असं जिल्हाधिकारी सोमवंशी यांनी सांगितलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button