breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप-राष्ट्रवादीत साटंलोटं, राष्ट्रवादीचं भवितव्य अंधारात

  • पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपचे ‘रामराज्य’
  • राष्ट्रवादी ‘तेरी भी चूप और मेरी भी चूप’च्या भूमिकेत

पिंपरी | महाईन्यूज | अमोल शित्रे

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादीचे पदाधिकारी चांगलेच सुस्तावल्याचे दिसते. पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाचे कामकाज असेल अथवा सत्ताधारी भाजपचा कारभार असेल, त्यावर कोणताही आक्षेप न नोंदविता सर्वकाही पारदर्शक चालल्याचे भासवत ”तेरी भी चूप और मेरी भी चूप” अशा भूमिकेत राष्ट्रवादीचे पदाधिकारी दिसत आहेत. जर, भाजपच्या विरोधात आवाज उठविता येत नसेल तर 2022 च्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे पुन्हा ”पानिपत” होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. कारण, विद्यमान पदाधिकारी चुकीच्या पध्दतीने वागत असल्यामुळे शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ”पुनरुज्जीवन” करण्याची जबाबदारी आता दुस-या फळीतील युवक कार्यकर्त्यांवर आल्याचे बोलले जात आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ताधारी भाजपचे ”पदाधिकारी बोले आणि प्रशासन हाले”, अशा पध्दतीने महापालिकेचा कारभार सुरू आहे. स्वीपर मशिन खरेदीची 600 कोटींची निविदा असेल, एम्पायर इस्टेट उड्डाण पुलाच्या रॅम्पचे 15 कोटींचे काम असेल, वायसीएमच्या अनेस्थेशीया वर्कस्टेशनची निविदा, वायसीएम वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीसाठीचा वाढीव खर्च असेल किंवा महापालिकेचे अंतर्गत लेखापरीक्षण व विशेष लेखापरीक्षण अशी अनेक कामे आक्षेपार्ह असताना विरोधक म्हणून आवाज उठविण्याची बांधिलकी राष्ट्रवादीला जपता आलेली नाही. गरज नसताना वाढीव रक्कमेच्या निविदा स्थायी समिती सभेत मंजूर केल्या जातात. मात्र, राष्ट्रवादीच्या सदस्यांकडून त्याला कसलाही विरोध होत नाही. सर्वकाही रामराज्यातील कारभार चालल्याचा अविर्भाव आणून राष्ट्रवादीचे नगरसेवक ”तेरी भी चूप और मेरी भी चूप” अशा भूमिकेत वावरताना दिसत आहेत. ही परिस्थिती कायम राहिल्यास त्याचा फटका राष्ट्रवादीला बसणार, हे नाकारता येणार नाही.

काही ठेकेदार पक्षाच्या पदाधिका-यांचे नातेवाईक अथवा मर्जीतील असल्यामुळे प्रशासनाशी मिळतेजुळते घेऊन एखादे टेंडर पदरात पाडून घेतले जात आहे. त्यानंतर सत्ताधारी आणि प्रशासनाने चुकीचे काम केले तरी योग्यच आहे की, म्हणून सांगण्यास राष्ट्रवादीचे पदाधिकारी समोर येत असतात. त्यामुळे विरोधक कोण आणि सत्ताधारी कोण असा प्रश्न महापालिकेत आल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांना पडल्याशिवाय राहणार नाही. असे चित्र असताना पक्षाचा निर्भिडपणा टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत. महाविकास आघाडीची सत्ता आल्यापासून तर राष्ट्रवादीचे पदाधिकारी जणू काही एकहाती सत्ता असल्याच्या अविर्भावात वागत असल्याचे दिसते. आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने भाजपच्या कारभाराला तिव्र विरोध होताना दिसत नाही. माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांची निवेदने काढण्याची धडपड दिसत असली तरी शहरातील फादर बॉडी, युवक, महिला, विद्यार्थी अथवा युवती या कोणत्याच फळीतील कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आवाज उठवताना दिसत नाहीत. त्यामुळे पक्षाचे भवितव्य अंधारात दिसू लागल्याने पक्षातीलच काही जाणकारांनी चिंता व्यक्त केली आहे.

या कार्यकर्त्यांवर पक्षवाढीची भीस्त

शहरातील दुस-या फळीतील कार्यकर्त्यांच्या नावाची यादी राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यकारिणीने मागविल्याची माहिती समजते. त्यानुसार शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी युवक व तडफदार कार्यकर्त्यांची यादी तयार केल्याची माहिती समजते. त्यामध्ये चिंचवड विधानसभा मतदार संघावर फोकस केल्याचे सांगण्यात आले आहे. निवडक पदाधिका-यांना विश्वासात घेतल्याशिवाय गत्यांतर नसल्याचे पदाधिका-यांच्या लक्षात आले आहे. पुनावळेतून संदीप पवार, वाकडमधून ज्ञानेश्वर कस्पटे, पिंपळे सौदागर येथील संदीप काटे, सांगवी येथील अतुल शितोळे, नवी सांगवी येथील नवनाथ जगताप अशा काही निवडक कार्यकर्त्यांची नावे यादीत समाविष्ट असल्याची माहिती समजते. या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय चिंचवड विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी तळागाळात रुजणार नाही, असा त्यामागचा हेतू मानला जात असल्याचे समजते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button