breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडचा ‘बादशाह’ आमदार लक्ष्मण जगताप यांची ‘अटल’ मार्चेबांधणी!

  • आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी जोरात
  • ‘अटल महाआरोग्य’ शिबिरातून विरोधकांना आव्‍हान

पिंपरी (महा-ई-न्यूज) – कामगारनगरी पिंपरी-चिंचवडच्या राजकारणातील ‘बादशाह’ अशी ओळख असलेल्या आमदार लक्ष्मण जगताप यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘अटल’ मार्चेबांधणी सुरू केली आहे. अटल महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून जगताप यांनी तळागाळातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करुन दिल्यामुळे विरोधी पक्षातील इच्छुकांना आव्‍हान मिळाले आहे.

चिंचवड विधानसभा मतदार संघावर गेल्या पंधरा वर्षांपासून आपली पकड मजबूत ठेवण्यात आमदार जगताप यशस्वी झाले आहेत. एकेकाळी पिंपरी-चिंचवडचे कारभारी असलेल्या पवार कुटुंबियांचे विश्वासू शिलेदार असलेल्या जगताप यांनी अनधिकृत बांधकाम, भ्रष्टाचार आणि विकासकामांच्या मुद्यावर तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादीविरोधात बंड पुकारले. पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात जगताप यांनी पहिला सुरुंग लावला. आता महापालिका जगताप यांच्या ताब्यात आहे. तसेच, शहरातील तीन पैकी दोन विधानसभा मतदार संघात आमदार महेश लांडगे यांच्या मदतीने भाजपने वज्रमूठ बांधली आहे.

पार्थ पवारांच्या चर्चेमुळे रणनिती बदलली?
सध्या मावळ लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि ज्येष्ठ नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याबाबत चर्चा सुरू आहे. पार्थ यांना उमेदवारी मिळाल्यास लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे पारडे जड राहणार आहे. त्यातच शेतकरी कामगार पक्षही राष्ट्रवादीसोबत आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी तीव्र स्पर्धेत असलेले विद्यमान खासदार श्रीरंग बारणे (शिवसेना) आणि आमदार लक्ष्मण जगताप (भाजप) यांच्या गोटात शांतता आहे. वास्तविक, महिनाभरापूर्वी बारणे आणि जगताप यांनी लोकसभेचे वातावरण तापवले होते. दरम्यान, भाजप-शिवसेना युती झाल्यास मावळच्या जागेवर शिवसेना दावा करणार आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी जगताप यांनी ताकदीचा उमेदवार द्या… नाहीतर पराभवाला आम्हाला जबाबदार धरू नका, असे सूचक वक्तव्य केले होते. पार्थ पवार यांच्याविरोधात निवडणूक लढवून ‘रिस्क’ घेण्यास बारणे आणि जगताप दोघांचीही मानसिकता दिसत नाही. त्यामुळे जगताप यांनी चिंचवड विधानसभा निवडणुकीवर ‘फोकस’ केला असावा, असा तर्क राजकीय वर्तुळात लढवला जात आहे. तसेच, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची खासदार बारणे यांनी दिल्लीत भेट घेतली आहे. त्या भेटीमध्ये लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा झाली असावी, असेही बोलले जात आहे. त्यामुळे बारणे आणि जगताप काय निर्णय घेतात? याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

…जगतापांचा बालेकिल्ला अभेद्यच!
चिंचवड विधानसभा मतदार संघात भाजप, राष्ट्रवादी, शिवसेनेसह विरोधी गटांतील अनेकांनी आमदार जगताप यांच्याविरोधात मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र, गेल्या १५ वर्षांपासून मतदार संघात आपली ताकद कायम ठेवलेल्या जगताप यांनी थेट मतदारांपर्यंत संपर्क ठेवला आहे. तसेच, गेल्या विधानसभा निवडणुकीत विरोधातील सर्व उमेदवारांच्या मतांची गोळाबेरीज केली, तरी आमदार जगताप यांची मते जास्त होतात, असे मिस्कीलपणे जगताप समर्थक सांगतात. स्थानिक (गाववाले) आणि बाहेरचा असा वाद विद्यमान जगताप समर्थकांमध्ये निर्माण झाल्याचे चित्र आहे. मात्र, ऐन निवडणुकीच्यावेळी जगताप यांच्या सर्व विरोधकांचा सूर मवाळ होतो आणि सर्वजण जगतापांसाठी कामाला लागतात, हा इतिहास आहे. त्याला काही अपवाद असतीलही मात्र जगताप यांची मतदार संघावरील पकड पाहता सध्यस्थितीला जगतापांचा बालेकिल्ला अभेद्य आहे, असेच राजकीय जाणकारांचे मत आहे. त्यामुळे जगताप यांच्या विरोधात मोट बांधणा-या इच्छुक उमेदवारांना मोठ्या प्रमाणात जोर- बैठका माराव्या लागतील, यात तिळमात्र शंका नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button