breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडचा ‘गड’ जिंकण्यासाठी राष्ट्रवादीचा ‘हा योद्धा’ उतरणार आता मैदानात!

  • उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांची मोठी रणनिती
  • माजी आमदार विलास लांडे यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी देणार?

पिंपरी । विशेष प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेची आगामी निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ‘कारभारी’ तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी रणनिती आखली आहे. एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेली ही महापालिका पुन्हा ताब्यात घेण्यासाठी माजी आमदार विलास लांडे यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. त्यासाठी वरिष्ठ पातळीवर खलबते सुरू आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत २०१७ पासून भाजपाची सत्ता आहे. राष्ट्रवादीला रामराम ठोकलेले दोन आमदार सध्या भाजपाच्या तंबूत आहेत. राष्ट्रवादीतील दोन ‘शेर’ भाजपाने आपल्या जाळ्यात घेतल्यानंतर राष्ट्रवादीला पराभवाचा सामना करावा लागला. त्यात शहराच्या राजकारणातील मातब्बर नेते आझम पानसरे यांच्या भाजपाप्रवेशाने राष्ट्रवादी पुरती खचली होती. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी गेल्या आठवड्यात पिंपरी-चिंचवड महापालिका भवनाला भेट दिली. कोरोना परिस्थिती आणि उपाययोजना याबाबत जातीने आढावा घेतला. यावेळी लांडे आणि पानसरे यांचीही उपस्थिती होती. विशेष म्हणजे, यावेळी पवार आणि लांडे यांच्यामध्ये शहरातील मुद्यांवर सविस्तर चर्चाही झाली. त्यामुळे लांडे यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी देवून पुनरागमन होणार, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.


राष्ट्रवादीचे ‘बब्बर शेर’ भाजपाला भारी पडणार?
महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राज्यातील सत्तेतील प्रमुख पक्ष आहे. शहरातील भाजपाच्या दोन्ही आमदारांविरोधात वातावरण निर्माण झाले आहे. आझम पानसरे यांनी राष्ट्रवादीत वापसी केली आहे. माजी आमदार विलास लांडे पुन्हा सक्रीय झाले आहेत. त्यामुळे भाजपाला मिळालेले दोघा ‘शेर’वर आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीचे दोन ‘बब्बर शेर’ अर्थात लांडे आणि पानसरे भारी पडतील, असा अंदाज राजकीय जाणकारांनी वर्तवला आहे.


माजी आमदार विलास लांडे शहरातील सर्वमान्य नेतृत्व…
पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासात माजी आमदार विलास लांडे यांचे मोठे योगदान आहे. विधानसभा सभागृहात लांडे यांनी १० वर्षे शहराचे प्रतिनिधीत्व केले आहे. महापालिका कामकाजाचा गाढा अभ्यास आहे. विशेष म्हणजे, पिंपरी-चिंचवडचे ‘शरद पवार’ म्हणून आजही लांडेंचा शहरात दबदबा आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी थेट संपर्क असलेला नेता म्हणून लांडेंची ओळख आहे. विधानसभा निवडणुकीपत राष्ट्रवादी अडचणीत असताना ’८० वर्षांचा तरुण योद्धा’ महाराष्ट्रासाठी धावून आला. राज्यातील चित्र बदलले. त्याच धर्तीवर आता पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचा अनुभवी चेहरा पुढे करून आगामी महापालिका निवडणुकीत भाजपाला तगडे आव्हान देण्याची तयारी राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींनी केली आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button