पिंपरी / चिंचवड

कोयाळी गावात दोन गटात तुंबळ हाणामारी : परस्पर विरोधात 22 जणांवर गुन्हे दाखल

पिंपरी l प्रतिनिधी

खेड तालुक्यातील कोयाळी तर्फे चाकण गावात दोन गटात किरकोळ कारणावरून तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये दोन्ही गटांनी परस्पर विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. एकूण 22 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कांताराम बाबाजी दिघे (वय 32, रा. कोयाळी, बापदेववस्ती, ता. खेड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गंगाराम देवराम टेंगले, माणिक गंगाराम टेंगले, गोवर्धन गंगाराम टेंगले, विकास गणपत टेंगले, हिरामण गणपत टेंगले, आकाश बाळासाहेब कोळेकर, हौसाबाई गंगाराम टेंगले, सुहासिनी बाळासाहेब कोळेकर, गंगाराम देवराम टेंगले, देविदास भाऊसाहेब टेंगले, अक्षय बाळासाहेब कोळेकर (सर्व रा. कोयाळी, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या लॉंड्रीच्या दुकानात येऊन आरोपींनी ‘तू माझ्या व युवराज साबळे याच्या जमिनी व्यवहारात माझे नाव खराब करत आहे’ असे म्हणून लोखंडी रॉडने मारहाण केली. फिर्यादी यांचा भाऊ निलेश रॉड अडवण्यासाठी आला असता आरोपींनी त्याला देखील लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केले. फिर्यादी यांची आई आणि बहीण यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादी यांचा मोठा भाऊ तिथे पळत आला असता त्याला देखील ‘याला पण सोडू नको’ असे म्हणत आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ‘आमची गावात दहशत आहे. कोणी मध्ये पडायचे नाही. जो पडेल त्याला सोडणार नाही’ असे म्हणून दहशत माजवली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याच्या परस्पर विरोधात गंगाराम देवराम टेंगले (वय 60, रा. कोयाळी, राणूबाई वस्ती, ता. खेड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार कांताराम दिघे, निलेश बाळासाहेब दिघे, अक्षय बाळासाहेब दिघे, मछिंद्र दिघे, समाधान अनिल कोळेकर, दौलत लक्ष्मण कोळेकर, राहुल अनिल कोळेकर, सुखदेव बाबाजी दिघे, ताईबाई बाबाजी दिघे, ज्योती कांताराम दिघे, स्वाती सुखदेव दिघे (सर्व रा. कोयाळी, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कांताराम फिर्यादी यांना म्हणाले की, ‘युवराज साबळे याच्या जमीन व्यवहारातील कमिशनचे पैसे मला का दिले नाहीत’ त्यावर फिर्यादी यांनी ‘तो व्यवहार तू केला नसून तुझा काय संबंध नाही’ असे सांगितले. त्यावरून कांताराम याने फिर्यादीस शिवीगाळ, दमदाटी करून हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादी यांचा मुलगा तिथे आला असता आरोपीने त्याच्या अन्य साथीदारांना बोलावून फिर्यादी, त्यांचा मुलगा माणिक टेंगले, पत्नी हौसाबाई, चुलत भाऊ गणपत टेंगले, मोठा मुलगा गोवर्धन, पुतण्या वसंत टेंगले यांना बेदम मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास आळंदी पोलीस करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button