breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पालिकेच्या तत्परतेमुळे वाचले एकाचे प्राण, सारथी हेल्पलाईनवर आला होता फोन

पिंपरी | महाईन्यूज| प्रतिनिधी

दुपारचा सव्वा वाजला होता. रणरणत्या उन्हामुळे अंगाची लाही लाही होत होती. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कोविड-१९ वॉर रुममध्ये रोजच्या प्रमाणे प्रत्येक कर्मचारी आपापल्या कामामध्ये व्यस्त होता. तेवढ्यात पीसीएमसी स्मार्ट सारथीच्या हेल्पलाईनचा दूरध्वनी खणखणला. वॉर रुममधील हेल्प-डेस्क टीममध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याने तातडीने फोन उचलला.

तिकडून एक अज्ञात व्यक्ती बोलत होती. पिंपरीतल्या शगुन चौकामध्ये एक नागरिक बेशुद्ध होऊन पडल्याचे फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने सांगितले आणि फोन बंद झाला. रहदारीच्या, गजबजलेल्या शगुन चौकामध्ये नुकतीच बाजारपेठ सुरु झाल्यामुळे नेहमीप्रमाणे गर्दी होती. परंतु कोरोना साथीमुळे मदतीसाठी कुणी पुढे आले नाही. तरीदेखील मानवतेच्या भूमिकेतून काही लोक बेशुद्ध पडलेल्या नागरिकाच्या आसपास जमले होते. ते थोड्या अंतरावर उभे होते परंतु सध्याच्या कोरोना साथीच्या धसक्यामुळे कुणीच पुढे होऊन मदत करण्याचं धाडस दाखवत नव्हते. अर्थात नागरिकांचे देखील बरोबरच होतं.

घड्याळाचे काटे पुढे सरकत होते. नागरिकाचे प्राण वाचवण्यासाठी प्रत्येक क्षण महत्त्वाचा होता. वॉर रूममध्ये फोन येईपर्यंत पंधरा मिनिटं सहज झाली असावीत. फोन आल्यानंतर इकडे वॉर रुममध्ये आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल यांनी तातडीने हालचाल सुरु केली. एका क्षणाचाही विलंब करून चालणार नव्हते. तत्काळ सूत्रे हलली. वॉर रुममध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची निगराणी करणारे ओमप्रकाश बहिवाल यांनी लगेच सीसीटीव्हीच्या सहाय्याने घटनास्थळ गाठले आणि बेशुद्ध पडलेल्या नागरिकाला शोधून काढले. ही सर्व माहिती पोलीस विभागाला तत्काळ कळवण्यात आली. अवघ्या काही मिनिटांमध्ये पोलीस घटनास्थळावर पोहोचले. जमलेल्या नागरिकांना बाजूला करण्यात आले. देवदूत बनून आलेल्या पोलिसांनी बेशुद्ध पडलेल्या नागरिकाला काळजीपूर्वक वाहनामध्ये घेतलं आणि यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल केलं. या नागरिकावर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. डॉक्टरांच्या देखरेखीमध्ये आता या नागरिकाच्या प्रकृतीमध्ये हळूहळू सुधारणा होत आहे.

हा सगळा प्रसंग दिनांक २३/०५/२०२० रोजी म्हणजेच आज दुपारी १:१५ मिनिटांनी घडला. आधुनिक तंत्रज्ञान आणि तत्पर प्रशासन यांच्यामुळे एकाचा प्राण वाचला. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सुरु केलेल्या कोविड-१९ वॉर रुममध्ये असे वेगवेगळे अनेक अनुभव येत आहेत. वॉर रुममुळे नागरिकांना संकटकाळी मदत मिळत आहे. कोरोना साथीच्या काळात वॉर रूममध्ये नागरिकांसाठी दिवसरात्र काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या तत्पर सेवेमुळे हे शक्य होत आहे

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button