breaking-newsमुंबई

पारसी बांधवांना अग्यारीत प्रार्थनेला जाण्यास परवानगी

मुंबई – जैन समुदयापाठोपाठ आता पारसी समुदायाचा ‘फरवार्दियान’ हा वार्षिक प्रार्थना विधी पार पाडण्यासाठी मुंबईतील डुंगरवाडी येथील अग्यारी खुली करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने काल बुधवारी सशर्त परवानगी दिली आहे. मात्र आपण दिलेला निर्णय हा अपवादात्मक असून या आदेशाचा आधार घेऊन इतर कोणत्याही धार्मिक कार्यासाठी किंवा प्रार्थनेसाठी कोणालाही अशीच परवानगी देण्यात येईल असे कोणी गृहीत धरू नये असेही उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

दक्षिण मुंबईतील केम्प्स कॉर्नर येथील डुंगरवाडी अग्यारी ५५ एकरात पसरलेली आहे. या परिसरात पाच विस्तीर्ण मंडप उभारण्यात आले असून दर तासाला फक्त सहा जणांना मंडपात जाण्यास परवानगी देण्यात येईल असे याचिकाकर्त्यांच्यावतीने बाजू मांडताना ऍड. प्रकाश शहा यांनी न्यायालयाला सांगितले. त्यांची बाजू ग्राह्य धरत खंडपीठाने ‘फरवार्दियान’ या वार्षिक प्रार्थना विधीसाठी डुंगरवाडी येथील अग्यारी खुली करण्यास सशर्त परवानगी दिली आहे. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता १० वर्षाखालील तसेच ६५ वर्षावरील ज्येष्ठांना या प्रार्थना विधीमध्ये सहभाग घेण्यास खंडपीठाने आदेशात मनाई केली आहे. तसेच आज गुरुवारी सकाळी ७ ते सायंकाळी ४.३० दरम्यान फक्त २०० लोकांनाच सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली होती. एकावेळी जास्तीत जास्त ३० लोकांनाच अग्यारीमध्ये सोडण्यात यावे असेही आदेशात नमूद केले आहे. यासोबतच प्रार्थनेसाठी येणाऱ्यांचे शारीरिक तापमान नोंदवणे, मास्क, सॅनिटायझर्सचा वापर करणे, सामाजिक अंतराचे भान राखणे, स्वच्छता इत्यादी सर्व सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे अनिवार्य असल्याचेही उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे. याआधी पर्युषण काळात मुंबईतील तीन मंदिरे पूजेसाठी खुली करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button