breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

पहिल्याच आगीत ‘फायर रोबो’च्या मर्यादा उघड

आग विझवण्यासाठी पालिकेने मोठा गाजावाजा करून तब्बल एक कोटी रुपये खर्चून आणलेला रोबो पहिल्याच कसोटीत नापास झाला. अग्निशामक दलातील जवानांना या रोबोमुळे मदत होईल अशी अपेक्षा होती मात्र प्रत्यक्षात या रोबोलाच धकका मारण्याचे काम अग्निशामक दलातील जवानांना करावे लागले. आग विझवण्यासाठी फवारलेले पाणी जिन्यावरून येत असल्यामुळे रोबो वर चढत नव्हता असा युक्तिवाद अधिकाऱ्यांनी केला आहे.

नालेसफाईसाठी आणलेले रोबो नापास झालेले असताना आता आग विझवण्यासाठी आणलेला रोबोही कुचकामी ठरला आहे. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी उद्घाटन केलेल्या या रोबोने पहिल्याच लढाईत मान टाकल्यामुळे आता या रोबोच्या अपयशाचे खापर कोणावर फोडायचे, असा प्रश्न पडला आहे.

वांद्रे येथील एमटीएनएलच्या कार्यालयाला सोमवारी लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाने  रोबोचे उद्घाटन केले. तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर लागलेली आग विझवण्यासाठी हा रोबो जायला निघाला खरा, पण वर त्याला चढताच आले नाही. मग जवानांनाच या रोबोला धक्का मारावा लागला. रोबोच्या कामगिरीमुळे पालिकेचे हसे झाले. बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत या प्रकाराचे पडसाद उमटले तेव्हा पालिकेच्या अधिकाऱ्यांनी या रोबोची बाजू मांडताना कसरत करावी लागली. मात्र हा रोबो वर चढलाच नाही तर तो काय कामगिरी करणार, असा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे. या रोबोची आधी चाचणी घेतली नव्हती का, उंच इमारतीत आग विझवण्यासाठी तो उपयोगाचा नाही का याची चाचणी केली की नाही, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

करदात्यांचे पैसे वाया

भाजप, समाजवादी, काँग्रेसच्या सदस्यांनी एक कोटीचा रोबो खरेदीवरील करदात्यांच्या पैसा वाया गेल्याची टीका स्थायी समितीमध्ये केली. एक कोटी रुपयांचा रोबो खरेदी करून तो फेल ठरल्याने या प्रकरणी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी केली. मुंबईत रोबो कितपत उपयोगी पडेल याचा अंदाज घेऊन त्याची खरेदी केली पाहिजे होती, अशी सूचना अभिजीत सामंत यांनी केली.

पाण्याच्या प्रवाहामुळे चढाईत अपयश!

एमटीएनएलच्या इमारतीत आग विझवण्यासाठी आठ अग्निशमन गाडय़ांतून मिनिटाला दोन हजार लिटर पाण्याची फवारणी करण्यात येत होती. पाण्याचा हा प्रवाह मोठय़ा वेगाने जिन्यावरून खाली येत होता. शिवाय जिन्यात असणाऱ्या आठ पाइपमुळे रोबोला पायऱ्यांवरून सरकता येत नव्हते, असा दावा अग्निशमन दलाने केला आहे. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे यांनीही हेच कारण दिले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button