breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

“मुख्यमंत्री अजूनही हॉलिडे मूडमध्ये तर गृहमंत्री विकेंड मूडमध्ये”; आशिष शेलारांना धमकी मिळाल्यानंतर चित्रा वाघ संतापल्या

मुंबई |

भाजपा आमदार आशिष शेलार यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी आशिष शेलार यांना फोनद्वारे धमकी देण्यात आली होती. आशिष शेलार यांनी याप्रकरणी पत्र लिहून पोलीस आयुक्ताकडे तक्रार दाखल केली आहे. शेलार यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी देत एक अज्ञात इसम अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर भाजपाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी देखील यावरुन ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

“आशिष शेलार आणि त्यांच्या परिवाराविरोधात विखारी भाषा वापरत जिवे मारण्याची धमकी दिली आहे. धमकी देऊन कित्येक तास उलटले तरी कायदा सुव्यवस्था सुस्त पडली आहे. मुख्यमंत्री महोदय तुम्ही सरकार काय तालिबान्यांना चालवायला दिले आहे का? राज्यातल्या महत्त्वाच्या नेत्यांना धमक्या दिल्या जात आहे. त्यामुळे राज्यामध्ये सरकार नावाची कोणती गोष्ट शिल्लक आहे का? मुख्यमंत्री स्वतः हॉलिडे मूडमध्ये आहेत तर गृहमंत्री विकेंड मूडमधून बाहेर आलेले नाहीत. राज्यामध्ये कशाप्रकारे अंधाधुंदी चालू असल्याचे आपण पाहत आहे. त्यामुळे २४ तासांच्या आत आशिष शेलार यांना ज्याने धमकी दिली आहे त्याच्या मुसक्या आवळा. शेलार आणि त्यांच्या परिवारातील सदस्याला काही झाले तर त्याची जबाबदारी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांवर असणार आहे,” अशी प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली आहे.

“जे जे भाजपाचे नेते पुढे येऊन सरकारच्या विरोधात आवाज उठवत आहेत त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. राज्यातल्या महत्त्वाच्या नेत्यांवर अशा पद्धतीने हल्ले होत असतील तर राज्यात सरकार आहे का हा प्रश्न निर्माण होतो,” असेही चित्रा वाघ म्हणाल्या. यावेळी बोलताना रश्मी ठाकरे प्रकरणावरुन सुरु असलेल्या वादात अमृता फडणवीस यांनी ओढल्याने चित्रा वाघ संतापल्या. राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली आहे. “सत्ताधारी पक्षाच्या महिलांचा सन्मान आणि इतर महिलांची इज्जत कचरा आहे का? असभ्य भाषेचे कोणीही समर्थन करत नाही. पण असभ्य भाषा वापरल्याचे म्हणत कारवाई झाली तर विद्या चव्हाण यांच्यावर पोलीस कारवाई कधी करणार? आम्ही वाट पाहत आहोत की मुंबई पोलीस विद्या चव्हाण यांच्यावर कारवाई कधी करणार आहेत,” असे चित्रा वाघ म्हणाल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button