breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

निष्क्रिय अधिका-यांमुळे यमुनानगरात पाणी पुरवठा समस्यांचा ‘महापूर’

  • नगरसेवकांच्या सूचनांकडे अधिका-यांचे दुर्लक्ष
  • आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या दालनासमोर उपोषण करणार

पिंपरी / महाईन्यूज

गेल्या दहा दिवसांपासून निगडी – सेक्टर 22 आणि यमुनानगर भागाचा पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यामुळे नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. प्रभागातील चारही नगरसेवक नागरिकांना पुरेसे पाणी मिळण्यासाठी प्रयत्नशिल आहेत. मात्र, महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील सह शहर अभियंता रामदास तांबे त्यांना प्रतिसाद देत नसल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. विस्कळीत पाणी पुरवठ्याचा प्रश्न त्वरीत मार्गी लावावा, अन्यथा आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या दालनासमोर अमरण उपोषण करण्याचा इशारा नगरसेवक सचिन चिखले, सुमन पवळे, उत्तम केंदळे, कमल घोलप यांनी दिला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात पाणी पुरवठ्याच्या असंख्य तक्रारी वाढत आहेत. त्यावर आयुक्त हर्डीकर मार्ग काढत नसल्यामुळे नागरिकांना आणखीन त्रास सहन करावा लागत आहे. निष्क्रिय पाणी पुरवठा विभागातील अधिका-यांमुळे पाण्याच्या समस्या वाढल्या आहेत. नगरसेवक नागरिकांच्या समस्या सोडविण्याची तत्परता दाखवत आहेत. मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील निष्क्रिय अधिका-यांनी झोपेचे सोंग घेतले आहे. निगडी सेक्टर 22, यमुनानगर परिसरात पुरेसे पाणी सोडले जात नाही. नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी मनसेचे गटनेते सचिन चिखले, राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नगरसेविका सुमन पवळे, भाजपचे नगरसेवक उत्तम केंदळे आणि नगरसेविका कमल घोलप आहोरात्र प्रयत्न करत आहेत.

या चारही नगरसेवकांनी फ प्रभाग कार्यालयातील अधिका-यांकडे पाण्याच्या समस्येवर मार्ग काढण्याची विनंती केली. मात्र, अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवत असल्यामुळे समस्या सोडविण्यास विलंब होत आहे. याबाबत विचारल्यानंतर पाईपलाईन चोकअप झाली, वितरण व्यवस्थेतील बिघाड, पाण्याची अपुरी उपलब्धता अशा बोटचेपी उत्तरांची मालिकाच अधिकारी तांबे वाचून दाखवितात. मात्र, समस्या सोडविण्याची तत्परता दाखविली जात नाही. त्यामुळे चारही नगरसेवकांना रात्री अपरात्री नागरिकांचा फोन आल्यानंतर पाणी समस्येचे निराकरण करण्यासाठी घराबाहेर पडावे लागत आहे. गेली पाच ते सहा दिवस चारही नगरसेवक रात्री उशिरापर्यंत किंबहुना पहाटे तीन वाजेपर्यंत पाण्याच्या समस्येवर मार्ग शोधत होते. मुळात वितरण व्यवस्थेतील बदल अभियंत्यांना माहित असतो. त्यांनी त्याठिकाणी येऊन समस्या शोधून सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असते. मात्र, तसे होताना दिसत नाही. त्यामुळे प्रभागातील चारही नगरसेवक आयुक्तांच्या कक्षासमोर उपोषण करण्याच्या तयारीत आहेत.

गेल्या अठ दिवसांपासून पाण्याची समस्या अतिशय गंभीर बनत चालली आहे. वितरण व्यवस्थेतील त्रुटी निदर्शनास येत नसल्यामुळे नाहक रात्रभर शोधमोहीम करावी लागत आहे. तरीही, नेमका कोणत्या ठिकाणी अडथळा आहे, हे कळत नसल्यामुळे नाहक दमछाक होत आहे. पालिका प्रशासनाला कळवून देखील कोणी जागेवर येऊन पाहणी करत नसल्यामुळे समस्या आणखीनच कठीण बनत चालली आहे. दोन दिवसांत ही समस्या नाही सुटली तर पालिकेतील आयुक्तांच्या कार्यालयात मनसे स्टाईलने आंदोलन केले जाईल.

गटनेते सचिन चिखले, मनसे


नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा करत आहोत. मात्र, अधिकारी आम्हाला दाद देत नसल्यामुळे त्याचा परिणाम म्हणून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. अपु-या पाणी पुरवठ्याचे कारण अधिका-यांनी समोर येऊन सांगावे. ज्याठिकाणी समस्या आहे, त्याठिकाणी येऊन अधिका-यांनी पाहणी करावी. आम्ही नगरसेवक असलो तरी वितरण व्यवस्थेची माहिती अधिका-यांनाच माहीत असते. अधिका-यांनी प्रभागातील पाण्याची समस्या नाही सोडविल्यास आयुक्त हर्डीकर यांच्या कक्षासमोर अमरण उपोषण करणार.

नगरसेवक उत्तम केंदळे, भाजप


आजपर्यंत कधीच पाण्याची एवढी समस्या निर्माण झाली नाही. परंतु, गेल्या आठ दिवसांपासून यमुनानगर भागात पाण्याची समस्या अतिशय गंभीर बनली आहे. वेळेत पाणी सोडले जात नसल्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. पहाटे चार वाजता आणि दुपारी दोनच्या दरम्यान दिवसाआड पाणी सोडले जाते. तेही पुरेसे मिळत नसल्यामुळे नागरिकांचा संताप उडत आहे. त्यांच्या तक्रारी सोडविण्यासाठी अधिका-यांशी संपर्क साधल्यानंतर त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नाही. आयुक्त हर्डीकर यांनी समस्या सोडविण्यासाठी मार्ग शोधावा, अन्यथा उपोषण करणार

ज्येष्ठ नगरसेविका सुमन पवळे, राष्ट्रवादी


महापालिका अधिका-यांच्या चुकीच्या कामामुळे यमुनानगर भागात पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. ज्याठिकाणी पाईपलाईन चोकअप झाली. तेथील काम करवून घेण्यासाठी आम्ही चारही नगरसेवक रात्रभर झटत आहोत. परंतु, पालिकेचा एकही अधिकारी त्याठिकाणी येऊन पाहणी करण्याची तयारी दाखवत नाही. पाणी पुरवठा सुरळीत करण्याची जबाबदारी अधिका-यांची आहे की नगरसेवकांची हेच कळत नाही. ही समस्या तातडीने सोडवावी, अन्यथा आम्ही सामुदायिक उपोषणाला बसणार आहोत.

नगरसेविका कमल घोलप, भाजप

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button