breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

नायर रुग्णालयातून अर्भकाचे अपहरण

आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; महिलेने बाळ पळवल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये उघडकीस

नायर रुग्णालयातून पाच दिवसाच्या बाळाला पळवून नेल्याची घटना गुरुवारी घडली. बाळाची आई झोपलेली असताना वार्ड क्रमांक सात मधून एका महिलेने बाळ पळवून नेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून उघडकीस आले असून याप्रकरणी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पाच दिवसांपूर्वी नायर रुग्णालयात दहिसर येथे राहणाऱ्या शीतल साळवी (३४) यांची सिझेरियन पद्धतीने प्रसूती झाली होती. त्यांना वार्ड क्रमांक सात मध्ये ठेवले होते. शीतल झोपल्या असताना त्यांच्या जवळच बाळ झोपवले होते. शीतल यांना जाग आल्यानंतर बाळ जवळ नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. लगेचच त्यांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना कळविले. संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास ही घटना घडली.

सगळीकडे शोध घेतल्यानंतर बाळ सापडत नाही असे लक्षात आल्यावर नातेवाइकांनी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. या प्रकरणी पोलिसांनी रुग्णालय प्रशासनाची चौकशी केली. वार्डमधील सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी केली. यामध्ये आकाशी रंगाच्या कुर्त्यांमध्ये एक महिला वार्डमध्ये बराच वेळ संशयितरित्या फिरत असल्याचे दिसले. त्यानंतर हीच बाई गेटवरून धावत बाळाला घेऊन जात असल्याचे दिसले. या बाईचे वय अंदाजे ४० वर्ष असून बाळाचे नातेवाईक किंवा रुग्णालय प्रशासनातील कोणीही या बाईला ओळखत नसल्याचे सांगितले आहे. या बाईनेच बाळ पळविल्याचा संशय असून यासंबंधी अज्ञात महिलेविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती आग्रीपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम आगावणे यांनी दिली. गुन्हा शाखेचे पथकही बाळाचा शोध घेत आहेत. घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

या वार्डच्या आतील आणि बाहेरील बाजूसही सुरक्षा व्यवस्था आहे. घटना घडली त्या वेळेला नातेवाइकांच्या भेटीची वेळ होती. या वेळेत रुग्णालयात खूप गर्दी होते. या गर्दीचा फायदा बाळ पळवून नेलेल्या महिलेने घेतला असण्याची शक्यता आहे.    – डॉ. रमेश भारमल, नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button