breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

२६व्या आठवडय़ात गर्भपाताच्या परवानगीसाठी न्यायालयात धाव

‘लिव्ह-इन रिलेशनशिप’मधून गर्भवती राहिलेल्या तरुणीची याचिका

तीन वर्षे ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’मध्ये राहिल्यानंतर साथीदाराने पाठ फिरवली. या नातेसंबंधांतून गर्भवती राहिलेल्या तरुणीने एकीकडे साथीदाराने लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप केला आहे, तर दुसरीकडे त्याचा ठावठिकाणा सांगण्यास नकार दिला आहे. त्यामुळे तरुणीला २६व्या आठवडय़ात गर्भपातासाठी परवानगी द्यायची की नाही? याबाबतचा उच्च न्यायालय निर्णय देणार आहे.

न्यायमूर्ती आर. एम. बोर्डे आणि न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांच्या खंडपीठासमोर या तरुणीची याचिका गुरुवारी सुनावणीस आली. त्या वेळी या प्रकरणाच्या निमित्ताने विविध कायदेशीर मुद्दे आणि गुंतागुंत यावर चर्चा झाली. या मुलीच्या म्हणण्यानुसार, ती आणि तिचा प्रियकर तीन वर्षे ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’ राहत होते. त्यानंतर तो तिला सोडून निघून गेला. त्याचदरम्यान जानेवारी महिन्यात गर्भवती असल्याचे तिला कळले. त्यानंतर त्याला हरप्रकारे संपर्क साधण्याचा प्रयत्न तिने केला. मात्र त्याच्याकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. अखेर मे महिन्यात तिने आईला गर्भवती असल्याचे सांगितले. वैद्यकीय तपासणी करून गर्भपाताच्या मागणीसाठी त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. आपण या बाळाला जन्म देऊ शकत नाही. तसे केल्यास मानसिक त्रास सहन करावा लागेल आणि तो सहन करण्याची आपली तयारी नाही. शिवाय अविवाहित मातेचा सामाजिक कलंक आपल्यावर लागेल, असा दावा करत २६व्या आठवडय़ात गर्भपातास परवानगी देण्याची मागणी या तरुणीने केली.

‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहत असल्याचे या तरूणीने मान्य केले आहे. अशा नातेसंबंधांमध्ये प्रस्थापित झालेल्या लैंगिक संबंधांना बलात्कार म्हणता येऊ शकत नाही. शिवाय लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक संबंध ठेवणे आणि विश्वासघात करणे यामध्ये फरक आहे. तरुणीने बलात्काराची तक्रारही दाखल केलेली नाही. ती आणि गर्भ सुस्थितीत आहेत. अशा वेळी तिला २६व्या आठवडय़ात गर्भपातास परवानगी दिली जाऊ शकत नाही. किंबहुना तिने बाळाला जन्म द्यावा, असा युक्तिवाद राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी केला. गर्भ राहून एक दिवस उलटला तरी ते बाळ आपल्याला नको हे म्हणण्याचा महिलेला अधिकार राहत नाही, असे कायदा सांगतो. त्याचप्रमाणे गर्भात दोष असेल वा गर्भामुळे संबंधित महिलेच्या जीवाला धोका असल्यास २०व्या आठवडय़ानंतर गर्भपाताची परवानगी देता येऊ शकते. या प्रकरणात तसे काहीच नाही. उलट गर्भपात करायचा झाल्यास तिच्या ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मधील प्रियकरालाही प्रतिवादी करावे लागेल. हा त्या दोघांचा अधिकार आहे. परंतु ही तरुणी त्याचा ठावठिकाणाही सांगण्यास तयार नाही. या तरूणीने तिच्यावर बलात्कार झाल्याचे मान्य करावे. तिने तसे केले तर तिच्या गर्भपाताच्या परवानगीला विरोध करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही महाधिवक्त्यांनी न्यायालयाला सांगितले.

या युक्तिवादानंतर ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’मधील प्रियकराचे नाव, पत्ता सांगावा. त्याला हजर करण्याचे आदेश दिले जातील, अशी सूचना न्यायालयाने त्या तरुणीला केली. मात्र या तरुणीची तशी इच्छा नाही. किंबहुना सद्य:स्थितीला तिला त्याचा ठावठिकाणा माहीत नसल्याचा दावा तिच्या वकील अंजली अवस्थी यांनी केला. त्यानंतर न्यायालयाने याचिकेवरील निकाल राखून ठेवला.

प्रकरण काय?

ती आणि तिचा प्रियकर तीन वर्षे ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’मध्ये राहत होते. त्यानंतर तो तिला सोडून गेला. गर्भवती असल्याचे तिला जानेवारीत कळले. त्यानंतर तिने त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्याकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. मे महिन्यात तिने आईला गर्भवती असल्याचे सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button