breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

नवेकोरे कामगार रुग्णालय धूळखात

परळ येथील रुग्णालयातील अनेक विभाग परवानग्यांअभावी बंदच

अंधेरी साकीनाका येथील ‘राज्य कामगार विमा योजने’च्या (ईएसआयसी) कामगार रुग्णालयाला आग लागल्यानंतर महामंडळाच्या मुंबईतील रुग्णालयांची दुरवस्था समोर आली आहे. परळची ‘महात्मा गांधी स्मारक रुग्णालया’ची इमारत बांधून तयार आहे. परंतु आधुनिक वैद्यकीय उपकरणांनी सुसज्ज असलेल्या या रुग्णालयातील अनेक विभाग परवानग्यांअभावी कुलूपबंद असून स्वस्तातील उपचारांपासून रुग्ण वंचित आहेत.

गिरणगावात वसलेल्या ईएसआयसी रुग्णालयाला केईएम या पालिका रुग्णालयाइतकेच महत्त्व होते. रुग्णालयात कायम रुग्णांची वर्दळ असे. आता हे रुग्णालय ओकेबोके झाले आहे. २००९ मध्ये रुग्णालयात दुरुस्तीची कामे सुरू झाली. नूतनीकरणानंतर अद्ययावत वैद्यकीय सुविधा आल्या. नवीन वैद्यकीय सुविधा देता याव्यात, यासाठी नवीन इमारत बांधण्यात आली. नवीन इमारतीचे बांधकाम वेगाने पूर्ण झाले. मात्र रुग्णांच्या सोयीसाठी जुन्या इमारतीतील काम टप्पाटप्प्याने पूर्ण करण्यात आले. याला आठ वर्षांचा अवधी लागला. दरम्यान, रुग्णांनी रुग्णालयाकडे पाठ फिरविण्यास सुरुवात केली, असे येथील एका कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. सध्या अपघात विभागात काही रुग्णांवर उपचार होत असले तरी हे प्रमाण कमी आहे. दुसरीकडे अद्ययावत वैद्यकीय सुविधा असलेली नवीन इमारत वापराविना बंद असल्याने त्याचा फायदा रुग्णांना होत नसल्याचे त्यांनी सांगितले.

२०१६ मध्ये दुरुस्तीच्यासह रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले. परंतु तेव्हापासून ही भव्य इमारत धूळ खात पडली आहे. सध्या नवीन इमारतीत भयाण शांतता आहे. तळमजल्यावरील स्वागत कक्षात कबुतरांनी बस्तान बसविले आहे. दुसऱ्या मजल्यावर उभारण्यात आलेल्या शस्त्रक्रिया विभागात अद्ययावत वैद्यकीय उपकरणे वापराविना पडून आहेत. तर प्रत्येक मजल्यावर अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. पडीक असल्याने नव्या इमारतीच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे जागोजागी कचरा आणि बांधकाम साहित्य पडून आहे. या अनागोंदी कारभाराविषयी माहिती घेण्यासाठी रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. जितेंद्र पाटील यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.

महाराष्ट्रातील कामगारांसाठी ईएसआयसीकडून राखीव झालेल्या निधीपैकी २० टक्के निधीदेखील वापरला जात नाही. हा पैसा रुग्णालयांच्या नूतनीकरणासाठी आणि वैद्यकीय उपकरणांच्या खरेदीसाठी थोडाफार वापरला जातो. मात्र डॉक्टर आणि परिचारिकांच्या कमतरेमुळे या सेवेचा कोणताही फायदा रुग्णांना होत नाही. डॉक्टर आणि परिचारिकांना पाच वर्षांच्या कंत्राटी पद्धतीने कामावर घेण्यात येते. त्यामुळे ते टिकत नाही. परिणामी या रुग्णालयांची दुरवस्था झाली आहे.    – डॉ. डी. एल. कराड, अध्यक्ष, सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button