breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

चार दुर्घटनांत सात जणांचा बळी

नियमबाह्य़ बांधकाम, बेकायदा वापर अपघातांना कारणीभूत

नियम धुडकावून बांधकाम करणे, भोगवटा प्रमाणपत्र नसताना इमारतीचा वापर करणे याची परिणती काय होऊ शकते हे रविवारी मुंबईच्या विविध भागांत अनुभवास आले. या एकाच दिवसात शहरात गोरेगाव, कांदिवली येथे झालेल्या चार अपघातांत सात जणांचा नाहक बळी गेला. माहीम येथील झोपडपट्टीत लागलेल्या आगीत आसिम खान (१४) हा ९० टक्के भाजला असून त्याच्यावर शीव रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गोरेगावच्या मोतीलालनगर येथील म्हाडाच्या चाळीतील बेकायदा बांधकाम सकाळी सव्वा नऊच्या सुमारास कोसळले. यात अडकलेल्या ११ जणांना बाहेर काढण्यात आले. यात रमण कुमारे गोरे मंडार (३०), सुभाष चव्हाण (३८) आणि राजेंद्र मिशद या तिघांचा मृत्यू झाला, तर आठजण जखमी झाले.

खार पश्चिम येथील राजस्थान हॉटेलजवळील सात मजल्याच्या इमारतीतील ‘न्यू ब्युटी सलून’ला सकाळी ११च्या सुमारास आग लागली. पाण्याच्या सहा टँकरच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. रविवारी संध्याकाळी माहीम येथील रहेजा रुग्णालयाजवळील झोपडपट्टीलाही आग लागली. या आगीत असिम खान (१४) आणि रेहान खान (५०) जखमी झाले. यातील असिम हा जवळपास ९० टक्के भाजला असून त्याची प्रकृती गंभीर आहे.

स्वच्छतागृहात गुदमरून मृत्यू

कांदिवली (पूर्व) दामूनगरमधील कपडय़ाच्या कारखान्याला रविवारी सायंकाळी लागलेल्या आगीमुळे इमारत कोसळून चार जणांचा मृत्यू झाला. आग विझवल्यानंतर इमारतीचा ढिगारा उपसण्याचे काम सुरू असताना सोमवारी सकाळी पावणेसहाच्या सुमारास ४ मृतदेह आढळले. राजू विश्वकर्मा (३०), राजेश विश्वकर्मा (३६), भावेश पारेख (५१), सुदामा लालसिंग (३६) अशी मृतांची नावे असून ते दामू नगर नाका परिसरात राहात. रविवारी सुट्टी असल्याने कारखान्यात कमी कामगार होते. तळमजल्यावर वेल्डिंगचे काम सुरू असल्याने आग लागली. त्यावेळी हे चौघेही जीव वाचवण्यासाठी स्वच्छतागृहात गेले आणि तिथेच त्यांचा गुदमरून मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button