breaking-newsराष्ट्रिय

नरेंद्र दामोदरदास मोदी नाही, आईला ठेवायचं आहे आफताब नाव

२३ मे २०१९ रोजी भाजपाची देशात सत्ता आली. मोदी लाट नाही म्हणणाऱ्या सगळ्यांना भाजपाने ३०३ जागा जिंकून आणि भाजपाप्रणित एनडीए आघाडीने ३५० पेक्षा जास्त जागा जिंकून चोख उत्तर दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान झाले. मात्र नरेंद्र दामोदरदास मोदी हेच नाव एका कुटुंबासाठी डोकेदुखी ठरतं आहे. निकालाच्या दिवशी म्हणजेच २३ मे रोजी उत्तर प्रदेशातील गोंडा या ठिकाणी असलेल्या महरोर गावात एक मूल जन्माला आल्याची बातमी आली. या मुलाचं नाव कौतुकाने नरेंद्र दामोदरदास मोदी असं ठेवण्यात आल्याचंही समोर आलं,  मात्र आता या बाळाच्या आईला हे नाव बदलून बाळाचं नाव आफताब  ठेवायचं आहे. आम्ही हे नाव ठेवल्याने आमच्यावर काहीजणांनी बहिष्कार घातला गेला असं तिचं म्हणणं आहे.

नरेंद्र दामोदरदास मोदी असं बाळाचं नाव ठेवल्याने आम्हाला त्रास सहन करावा लागतोय असं मेहनाझ बेगम अर्थात या मुलाच्या आईने म्हटलं आहे. तिचा मावस भाऊ पत्रकार आहे. या सगळ्याचा दोष तिने तिच्या भावाला दिला आहे. माझा मुलगा १२ मे रोजी जन्माला आला २३ मे रोजी नाही असाही खुलासा तिने केला आहे. . इतकंच नाही तर अॅफिडेव्हिटमध्ये जे मी काही लिहून दिलं ते माझ्या मावस भावामुळे दिलं. मावस भावाने आम्हाला जे सांगितलं ते आम्ही ऐकलं ती आमची चूक ठरली असंही मेहनाझ बेगमने म्हटलं आहे. त्याने जे सांगितले ते ऐकून आम्ही हा सगळा घोळ घातला. दरम्यान असिस्टंट डेव्हलपमेंट ऑफिसर (पंचायत) घनश्याम पांडे यांनी या मुलाचे नाव नरेंद्र दामोदरदास मोदी असे ठेवले गेल्याचे सांगितले आहे.

बाळाचे नाव नरेंद्र दामोदरदास मोदी असे ठेवल्याने आम्हाला एवढा त्रास सहन करावा लागेल असं आम्हाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. मी माझ्या मावस भावाने जे काही सांगितले ते ऐकले. तो पत्रकार आहे, आम्हाला वाटलं तो सांगतोय तर तसे करू. माझा भाऊ मुश्ताक अहमद हा गोंडा येथील हिंदुस्थान या वर्तमानपत्रात काम करतो. २५ मे रोजी हिंदुस्थानच्या लखनऊ आवृत्तीत माझ्या मुलाचे नाव नरेंद्र दामोदरदास मोदी ठेवले गेल्याची  बातमी आली. अहमदच्या नावाने ही बातमी छापून आली. सगळी चूक माझ्या भावाचीच आहे असं मेहनाझने म्हटलं आहे.

दुसरीकडे मेहनाझच्या भावाने म्हणजेच मुश्ताकने हे सगळे आरोप खोडून काढले आहेत. मेहनाझ आता तिच्या बाळाच्या जन्माबाबत खोटं बोलते आहे. मी तिला कोणताही सल्ला दिला नव्हता. तिनेच मला सांगितलं की मी बाळाचं नाव नरेंद्र दामोदरदास मोदी ठेवलं आहे. तिने दिलेल्या माहितीवरूनच मी बातमी लिहिली. मला तेव्हा हे माहित नव्हतं की मेहनाझने बाळाच्या जन्माबाबत मला खोटी माहिती दिली.

दरम्यान मेहनाझने तिच्या बाळाला १२ मे रोजीच जन्म दिला होता अशी माहिती डॉ. आशुतोष शुक्ला यांनी दिली आहे. वझिरांगी येथील कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये मेहनाझची प्रसूती झाली होती. तिथल्याच डॉक्टरांनी ही माहिती दिली. मेहनाझने १२ मे रोजी बाळाला जन्म दिला आणि १३ मे रोजी आम्ही तिला डिस्चार्ज दिला असंही डॉक्टरांनी सांगितलं. हिंदुस्थान या वृत्तपत्राचे लखनऊ आवृत्तीचे संपादक के. के. उपाध्याय यांनीही याबाबत माहिती दिली. आम्हाला ही बातमी गावातून मिळाली त्यामुळे छापली. बाळाचं नाव नरेंद्र दामोदरदास मोदी हे ठेवलं गेल्याची खात्री आम्ही केली होती म्हणूनच बातमी केली असं त्यांनी म्हटलं आहे.

मेहनाझचा नवरा मोहम्मद मुश्ताक अहमद हा दुबईत असतो. तो या सगळ्या प्रकारामुळे आणि वादामुळे वैतागला आहे. माझा नवरा मला महिन्याला ४ हजार रूपये पाठवत असे. मात्र हे सगळं समजल्यापासून त्याने पैसे पाठवणेही बंद केले. आम्ही नरेंद्र दामोदरदास मोदी असे बाळाचे नाव ठेवल्याने आमच्या समाजातल्या काही लोकांनी आमच्यावर बहिष्कार घातला. आम्हाला या नावाचा बराच त्रास झाला आहे त्यामुळे हे नाव बदलून आता आफताब असे ठेवायचे आहे असे या बाळाच्या आईने म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button