breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

डॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉ. गोविंद पानसरे हत्या: ‘म्हातारे आरोपी पकडणार का?

मुंबई: डॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्यांमागील सूत्रधारांपर्यंत पोहोचण्यास अपयश आल्याची अप्रत्यक्ष कबुलीच सीबीआय आणि महाराष्ट्र एसआयटीने गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयासमोर दिली.

दाभोलकर हत्येचा तपास सीबीआय तर पानसरे हत्येच्या घटनेचा तपास महाराष्ट्र एसआयटी करत आहे. मात्र, तपासात प्रगती होत नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी याचिका केलेल्या आहेत. न्या. सत्यजीत धर्माधिकारी व न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर याविषयी सुनावणी झाली. यावेळी विशेष तपास पथकाने हतबलता व्यक्त केली. ‘तपास आता अशा टप्प्यावर आला आहे की, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तपास करून आणि प्रत्यक्ष छापा कारवाई करून काही हाती लागेल, असे वाटत नाही. आता आमची आशा केवळ कॉल डिटेल्स रेकॉर्ड तपासणे आणि शास्त्रीय पुरावे गोळा करणे यावरच आहे’, अशी माहिती एसआयटीतर्फे ज्येष्ठ वकील अॅड. अशोक मुंदरगी यांनी तपासाचा प्रगती अहवाल देताना दिली. सीबीआयतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनीही तसेच म्हणणे मांडले. सूत्रधारांपर्यंत पोहोचण्यात अपयश येत असल्याची एकप्रकारे कबुलीच तपास यंत्रणा देत असल्याचे पाहून खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘मग ही प्रकरणे तार्किक अंतापर्यंत कशी न्यायची? गुन्हेगारांना आपण कधीच पकडू शकणार नाही का? अशाच प्रकारच्या हत्यांच्या घटना वाढत असताना आम्ही ही प्रकरणे अशीच सोडून द्यायची का?’, असा संतप्त सवाल खंडपीठाने केला. तसेच पुढच्या सुनावणीपर्यंत सूत्रधारांपर्यंत पोहोचण्यासाठी तपासात ठोस प्रगती केली नाही, तर वरिष्ठ अधिकाऱ्यांना न्यायालयात बोलवावे लागेल, असा इशाराही दिला. ‘सूत्रधार व आरोपींना काही तरी संस्थात्मक पाठिंबा मिळत असण्याची शक्यता आहे. मग तुम्ही त्याचीच पूर्णपणे कोंडी का करत नाही? या प्रकरणांत तज्ज्ञ व्यक्तींची मदत का घेत नाही?’, अशी विचारणाही खंडपीठाने तपास यंत्रणांना यावेळी केली. अखेरीस पुढच्या वेळी तपासात ठोस प्रगती दाखवा, असे सीबीआय व एसआयटीला सांगून खंडपीठाने पुढची सुनावणी २८ जूनला ठेवली.

म्हातारे आरोपी शरण येणार का?

‘बॉम्बस्फोट खटल्यांतील आरोपींप्रमाणे २०-३० वर्षांनंतर थकलेले, म्हातारे झालेले आरोपी आपण पकडणार का? हल्ली मोठमोठ्या खटल्यांत आरोपी त्यांच्या सोयीने, त्यांना वाटेल तेव्हा समोर येतात. संपूर्ण आयुष्य जगून झाल्यावर आयुष्याच्या शेवटच्या टप्यावर आरोपी येथे येऊन स्वत:ला अटक करून घेतात. या प्रकरणांतही तसेच होणार का?’ असा सवालही खंडपीठाने यावेळी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button