breaking-newsमहाराष्ट्र

नपुंसकत्वाच्या भीतीपोटी सोलापूरमधील ४१ शाळांचा गोवर-रुबेला लस घेण्यास नकार

गोवर आणि रुबेला या आजारांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आरोग्य विभागाकडून २७ नोव्हेंबरपासून राज्यभर व्यापक लसीकरण मोहीम राबविण्यात आली आहे. राज्यभरातील सर्व शाळा आणि महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये ही लस देण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले होते. नऊ महिने ते १५ वर्षांपर्यंतच्या बालकांना ही लस दयावी असे आवाहन मुख्यमंत्र्यांनीही केले होते. मात्र आता अचानक या लसीबाबत गैरसमज निर्माण झाल्याने सोलापूरमधील ४१ शाळांनी ही लस आपण आपल्या शाळेतील मुलांना देणार नसल्याचे सांगितले आहे. ही लस घेतल्याने नपुंसकत्व येते अशी चुकीची माहिती पसरली आहे. त्यामुळे आपल्या शाळेतील मुलांच्या आरोग्याला धोका उद्भवू नये या भितीने शाळांनी लस घेण्यास नकार दिला आहे.

या शाळांमध्ये मराठी तसेच इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा समावेश असून त्यांच्याशी आयुक्त चर्चा करणार असल्याची माहिती आहे. या लसीच्या संदर्भात असणारे गैरसमज दूर करण्यासाठी सोलापूरचे आयुक्त शाळांच्या मुख्याध्यापकांसोबत तातडीची बैठक घेणार आहेत. बैठकीच्या माध्यमातून यावर योग्य तो तोडगा काढला जाणार आहे. २ दिवसांपूर्वीपासून ही लस देणे धोकादायक असल्याच्या व्हिडियो क्लीप समाजमाध्यमांवर फीरत होत्या. त्यामुळे पालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र त्याही खोट्या असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. या घटनांमुळे या लसीकरण मोहिमेला चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे.

याविषयी स्पष्टीकरण देताना आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत म्हणाले, गोवर-रुबेला ही लस धोकादायक नाही, त्यामुळे पालकांनी अजिबात काळजी करु नये. आपली मुले ही आमची मुले आहेत, गोवर आणि रुबेलासारख्या गंभीर आजारांची लागण होऊ नये म्हणून ९ महिने ते १५ वर्षे वयाच्या मुलांना ही लस द्यावी असे आवाहनही त्यांनी केले आहे. मीही माझ्या नातवंडांना ही लस देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे बालकांच्या आरोग्याला कोणताही धोका नसून पालकांनी मनात कोणतीही शंका न ठेवता आपल्या बालकाला लस द्यावी असे आवाहन डॉ. सावंत यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button