breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

धक्कादायक! फ्लॅट विक्रीचं आमिष दाखवत 112 जणांना तब्बल साडेचार कोटींना गंडा

नवी मुंबई : पनवेल तालुक्यातील चिपळे येथे नियोजित गृहप्रकल्पातील फ्लॅट विक्रीच्या अमिषाने 112 फ्लॅट बुकींगधारकांची फसवणूक झाली केली होती. या ग्राहकांना तब्बल साढेचार कोटी रुपयांना गंडा घालण्यात आला होता. याप्रकरणी आता फसवणूक करणाऱ्या शंकर पांडुरंग नांगरे या बांधकाम व्यावसायिकाला 3 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. पनवेल येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी ही शिक्षा देत 50 हजार रुपये दंडही लावला आहे. या प्रकरणात न्यायालयाने भरडल्या गेलेल्या पीडित फ्लॅट बुकींगधारकांना त्यांच्या रक्कमेवर 6.5 टक्के व्याज देण्याचे देखील आदेश देण्यात आले आहेत. या निकालामुळे सर्वसामान्यांची वेगवेगळ्या पद्धतीने फसवणूक करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

या प्रकरणात शिक्षा ठोठावण्यात आलेला आरोपी शंकर नांगरे हा श्री साई डेव्हलपर्स अँड बिल्डर्सचा मालक आहे. त्याने 4 वर्षापूर्वी पनवेलच्या चिपळे भागात साई अंबर रेसिडेन्सी नावाने भव्य गृहप्रकल्प उभारत असल्याची जाहिरातबाजी केली. या जाहिरातबाजीला भुलून 112 सर्वसामान्य नागरिकांनी नांगरे आरोपीच्या गृहप्रकल्पातील फ्लॅटची बुकिंग केली. फ्लॅटच्या बुकींगपोटी त्यांनी आरोपीला तब्बल 4 कोटी 54 लाख रुपये दिले होते. मात्र त्यानंतर नांगरे याने गृहप्रकल्पाचे कुठल्याही प्रकारचे बांधकाम केले नाही. तसेच नागरिकांना त्यांच्या बुकींगची रक्कमही परत न करता पोबारा केला. खांदेश्वर पोलिसांनी नांगरे विरोधात फसवणुकीसह मोफा कलमाअन्वये गुन्हा दाखल केला आहे. यानंतर आर्थिक गुन्हे शाखा युनिट-2 च्या पथकाकडे या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला.

यादरम्यान, आरोपी शंकर नांगरे याने अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी अलिबाग सत्र न्यायालयात अर्ज केला होता. सदर अर्जाच्या सुनावणी दरम्यान, आरोपी नांगरे याने पीडित फ्लॅट बुकींगधारकांना 50 लाख रुपये परत केले. परंतू उर्वरीत 4 कोटी 4 लाख रुपयांची रक्कम त्याने परत न केल्याने सत्र न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने आरोपी शंकर नांगरे याला सप्टेंबर 2018 मध्ये अटक करुन त्याच्या विरुद्ध सबळ पुरावे गोळा केले. त्याच्या विरोधात पनवेलच्या प्रथम वर्ग न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. तेव्हापासून आरोपी नांगरे हा न्यायालयीन कोठडीत आहे. मागील वर्षभर या खटल्याचे पनवेल येथील न्यायालयात कामकाज सुरु होते.

या सुनावणी दरम्यान, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी आरोपी शंकर नांगरे याला दोषी ठरवले. तसेच त्याला 3 वर्षे सश्रम कारावास आणि 50 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणातील पीडित फ्लॅट बुकींगधारकांना त्यांच्या 4 कोटी 4 लाख रुपयांवर फ्लॅट बुकिंग केल्यापासून गुन्हा नोंद करेपर्यंतच्या कालावधीसाठी 6.5 टक्के व्याज देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. या खटल्याचे न्यायालयीन सुनावणीचे कामकाज सहाय्यक संचालक आणि सरकारी अभियोक्ता अजित चव्हाण यांनी पाहिले. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे, राजु सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप सावंत आदींनी केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button