breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडीराष्ट्रिय

धक्कादायक खुलासा! एकाच IMEI क्रमांकावर तब्बल १३ हजार ५०० फोन; योगायोगाने झाला प्रकरणाचा भांडाफोड

प्रत्येक मोबाइल हँडसेटची विशिष्ट ओळख ठेवण्यासाठी ‘आयएमईआय’ क्रमांक त्याला दिला जातो. ‘इंटरनॅशनल मोबाइल इक्विपमेंट आयडेटिंटी’ अर्थात ‘आयएमईआय’ क्रमांक केवळ मोबाइलच नव्हे तर मोबाइल वापरकर्त्यांची ओळख जाणून घेण्यासाठी महत्त्वाचा असतो. अनेकदा मोबाइल चोरीला गेला किंवा त्याचा गैरवापर झाला तर गुन्ह्यांची उकल करण्यासाठी हा आयएमईआय क्रमांक महत्वाचा ठरतो. त्यामुळेच या क्रमांकाला खूप महत्व असते. प्रत्येक मोबाइलचा आयएमईआय क्रमांक हा वेगळा असतो तसं कायद्याने बंधनकारक आहे. मात्र मेरठमध्ये एकाच आयएमईआय क्रमांकाचे एक दोन नाही शेकडो नाही तर तब्बल १३ हजारहून अधिक मोबाइल आढळून आल्याने पोलिसही चक्रावले आहेत. 

मेरठ पोलिसांनी गुरुवारी आयएमईआय क्रमांकासंदर्भात एक धक्कादायक खुलासा केला आहे. भारतामध्ये एकाच आयएमईआय क्रमांकाचे १३ हजार ५०० मोबाइल अस्तित्वात असल्याची माहिती मेरठ पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात मोबाइल निर्मिती करणारी कंपनी आणि त्यांच्या सर्व्हिस सेंटरविरोधात फसणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मेरठ पोलीस दलातील पोलिस अधीक्षक (मेरठ शहर) अखिलेश सिंग यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार एका पोलीस कर्मचाऱ्याचा नवा मोबाइल फोन काम करत नसल्याने तो त्याने सायबर सेलच्या तज्ज्ञाकडे तपासण्यासाठी दिला आणि त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. पोलिसा खात्यामधील सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनी आपल्या यंत्रणेच्या मदतीने या कर्मचाऱ्याच्या मोबाइलचा आयएमईआय क्रमांक सर्च करुन पाहिला असता त्यांना धक्काच बसला. या पोलीस कर्मचाऱ्याकडे असणाऱ्या फोनच्या आयएमईआय क्रमांकाचे १३ हजार ५०० फोन वापरात असल्याची माहिती समोर आल्याचे सिंग यांनी सांगितलं.

प्राथमिक माहितीनुसार मोबाइल निर्माण करणाऱ्या कंपनीच्या चुकीमुळे एकाच आयएमईआय क्रमांकाचे एवढे फोन वापरात असण्याची शक्यता आहे. मात्र एवढ्या मोठ्याप्रमाणात एकाच आयएमईआयवर क्रमांकावर फोन वापरले जात असतील तर ते चुकीच्या कामासाठी वापरले गेल्यास तपास करणे कठीण असल्याचे मत पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केलं आहे. या प्रकरणात एका टीमची स्थापना करण्यात आली असून मोबाइल निर्मिती करणाऱ्या कंपनीबरोबरच सर्व्हिस सेंटरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button