breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

दादा, दुनिया बेईमान झाली तरी चालेल…पण, तुम्हाला ती मुभा नाही! पिंपरी-चिंचवड शहरात लक्ष घाला!

निष्ठावंतांचे भावनिक आवाहन : अजित पवार यांच्या भूमिकेकडे कार्यकर्त्यांचे लक्ष

पिंपरी । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी

मावळ लोकसभा निवडणुकीत पिंपरी-चिंचवडमधून झालेला पराभव… हक्काचे शहर असुनही झालेला अपेक्षाभंग…झारीतील शुक्राचार्यांनी केलेली गद्दारी… यामुळे पुरते हतबल झालेल्या माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडमधील पक्ष संघटना आणि राजकीय हालचालींमधून लक्ष काढून घेतले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या सर्वच बैठकांकडे अजित पवार यांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी अजित पवार म्हणजे दादांना भावनिक साद घातली आहे. दादा, दुनिया बेईमान झाली तरी चालेल. पण, तुम्हाला ती मुभा नाही…शहरात पुन्हा लक्ष घाला! ‘कल का सूरज हमारा है…’ अशी भूमिका अनेकांनी घेतली आहे.

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांना मोठ्या पिछाडीवर रहावे लागले. पिंपरी आणि चिंचवड विधानसभेत सुमारे दीड लाख मतांनी भाजप-शिवसेना युतीने आघाडी घेतली. शहरातून मोठ्याप्रमाणात मताधिक्य मिळेल, अशी अपेक्षा अजित पवार यांना होती. कार्यकर्ते, पदाधिकारी यांची तगडी फौज पार्थ यांच्या दिमतीला होती. शहराला अत्यंत जिव्‍हाळ्याने जपले आणि विकसित केले. तरीही स्वत:च्या मुलाला निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. त्यामुळे अजित पवार पुरते नाराज झाले आहेत. त्यांनी शहरातील महत्वाच्या बैठका आणि नियुक्त्यांकडे दुर्लक्ष केले आहेत. विरोधी पक्षनेता दत्ता साने यांनी कार्यकाळ संपल्यामुळे राजीनामा द्यावा किंवा नाही…यावरुनही संभ्रम दिसत आहे. शहराध्यक्ष संजोग वाघेरे म्हणतात, दादांनी राजीनामा घेण्याबाबत आदेश दिले आहेत. दत्ता साने म्हणतात मला अद्याप दादांचा फोन आला नाही…त्यामुळे संघटनात्मक पातळीवर समन्वयाचा किती अभाव आहे, हेच अधोरेखित होते.

***

शहरात पक्षाची ताकद आहे पण…

वास्तविक, शहरात राष्ट्रवादीचे ३६ + २ असे ३८ नगरसेवक आहेत. पूर्वी दोन्ही खासदार शिवसेनेचे होते. आता शिरुर राष्ट्रवादीने डॉ. अमोल कोल्हेंच्या रुपाने काबिज केला आहे. त्यामुळे भोसरी विधानसभा मतदार संघात योग्य जुळवाजुळव केल्यास पक्षाला संजीवनी मिळणार आहे. तसेच, शहरातील डॉ. कोल्हे यांचे ‘कार्ड’ आगामी विधानसभा निवडणुकीत चांगले चालणार आहे. परंतु, अजित पवार यांची इच्छाशक्ती महत्त्वाची आहे. लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांची भूमिका पाहता त्यांनी शहराला अक्षरश: दुर्लक्षित केले आहे, असेच चित्र आहे. पार्थ पवार यांच्याकडे शहराची धुरा सोपवण्याची चिन्हे आहेत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनीही शहरात लक्ष घातले आहे. मात्र, पिंपरी-चिंचवडचा ‘खडान्‌खडा’ माहीत असलेले अजित पवार यासर्वांपासून दूर पहायला मिळतात. परंतु, अद्यापही वेळ गेलेली नाही. पक्षाला उभारी देण्यासाठी अजित पवारांनीच पुढे आले पाहिजे. पिंपरी-चिंचवडमधील संघटना मजबूत केली पाहिजे. नवीन चेह-यांना संधी देवून पक्षाची ध्येय-धोरणे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजेत, अशी भूमिका पक्षातील काही निष्ठावंत बोलून दाखवत आहेत.

***

दादा, अजुनही वेळ गेलेली नाही!

प्रचंड मोदी लाटेत डॉ. अमोल कोल्हे निवडून येतात… भाजपचे अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री फडणवीस, महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्व ताकद पणाला लावूनही बारामतीमधून सुप्रिया सुळे  चांगल्या मताधिक्याने निवडून येतात, ही बाब अजित पवार यांनी लक्षात घेतली पाहिजे. पक्षांतर्गत आणि विरोधी पक्षातील संपूर्ण ताकद पणाला लावूनही अजित पवार यांना हरवण्यासाठी पार्थ विरोधात नको-नको तो प्रचार केला. तरीही सुमारे सव्‍वा पाच लाख मते मिळाली हे निश्चितच कमी नाही. अजुनही वेळ गेलेली नाही. पार्थ पवार यांच्या पराभवाची कारणमिमांसा करुन अजितदादांनी पुन्हा जोमाने कामाला लागले पाहिजे. शहरातील तीनही विधानसभा मतदार संघात निश्चितच पक्षाची ताकद आहे. गरज आहे ती केवळ योग्य आणि प्रभावी नियोजनाची. भोसरी पक्षाकडे बलाढ्य उमेदवार आहेत. पिंपरीत सत्ताधारी पक्षांतील इच्छुकांमध्ये प्रचंड रस्सीखेच आहे. त्याचा अचूक फायदा उचलल्यास राष्ट्रवादीला पोषक वातावरण आहे. चिंचवडमध्ये लोकसभा निवडणुकीत विरोधकांकडे मतांचा डोंगर दिसत असला तरी राष्ट्रवादी आणि भाजप-शिवसेनेतील नाराजांची तगडी मोट बांधल्यास विधानसभा निवडणुकीत पक्षाला चांगली टक्कर देता येईल. परंतु, त्यासाठी अजित पवार यांनी सकारात्मक दृष्टीकोनातून पक्ष संघटना आणि कार्यकर्त्यांना योग्य दिशा दिली पाहिजे, याबाबत कुणाचेही दुमत असण्याचे कारण नाही.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button