दहावी बारावीची फेरपरीक्षा 17 जुलैपासून
पुणे – राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी इयत्ता दहावी तसेच बारावीची फेरपरीक्षा 17 जुलैपासून घेण्यात येणार आहे; तर दहावी व बारावीची श्रेणी, तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा 9 ते 16 जुलै दरम्यान घेण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता दहावीची तसेच बारावीमध्ये अनुत्तीर्ण ठरलेल्या तसेच या आधी अनुतीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षा जुलै महिन्यात घेण्यात येते. त्यासाठी बारावीचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
दहावीची फेरपरीक्षा 17 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीत होणार आहे; तर बारावीची सर्वसाधारण विषयांची परीक्षा 17 जुलै ते 4 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. तर व्यावसायिक अभ्यासक्रमाची परीक्षा 17 जुलै ते 2 ऑगस्टदरम्यान होणार आहे. इयत्ता दहावी तसेच बारावीची प्रात्यक्षिक, श्रेणी व तोंडी परीक्षा 9 ते 16 जुलैदरम्यान होणार आहे. या संबंधितचे सविस्तर वेळापत्रक मंडळाकडून www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर पहाता येणार आहे. दरम्यान छापील वेळापत्रकानुसारच परीक्षा द्यावी अन्य व्हॉट्स ऍप व तत्त्सम गोष्टींवरील वेळापत्रकावर विश्वास ठेवू नये असेही आवाहन राज्य मंडळाकडून करण्यात आले आहे.