breaking-newsराष्ट्रिय

दक्षिण मुख्यालयाच्या जवानांचा केरळ मदतकार्यात सहभाग

केरळमधील पूरपरिस्थितीने विस्कळित झालेले जनजीवन सुरळीत करण्यासाठी लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाच्या जवानांनी मोलाचे योगदान दिले आहे. दक्षिण मुख्यालयाच्या कार्यक्षेत्रातून केरळ येथे मदतीसाठी गेलेल्या जवानांनी प्रतिकूल परिस्थितीत मदतकार्य राबवून हजारो नागरिकांचे प्राण वाचवले आहेत. तात्पुरत्या सार्वजनिक सुविधा उभ्या करण्यात देखील त्यांनी महत्त्वाचा वाटा उचलला आहे.

केरळ राज्यातील आपत्ती व्यवस्थापनाच्या कामात लष्करी जवानांनी वेगवान हालचाली करत परिस्थिती पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. २६ ठिकाणी तात्पुरते पूल उभे करून पन्नास रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत. पूरस्थितीमुळे तेथील आरोग्य सेवा विस्कळित झाली असून नागरिकांना प्राथमिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरही कार्यरत झाले आहेत. प्रथमोपचार, औषधांचा पुरवठा आणि साथीच्या आजारांपासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय अशा सर्व आघाडय़ांवर लष्कराचे डॉक्टर कार्यरत आहेत.

लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे कमांडर लेफ्टनंट जनरल डी. आर. सोनी यांनी पूरग्रस्त केरळ राज्याला भेट देऊन लष्करातर्फे राबवल्या जाणाऱ्या मदतकार्याची पाहणी केली. लेफ्टनंट जनरल डी. आर. सोनी म्हणाले, पुरामुळे राज्यभर भीषण परिस्थिती उद्भवली असून राज्यातील जनजीवन विस्कळित झाले आहे. अनेक ठिकाणी उजेडालाही शिरण्यासाठी जागा नाही, हेलिकॉप्टरने मदतकार्य पोहोचवणे देखील शक्य नाही. मात्र अशा परिस्थितीत लष्कराच्या जवानांनी सुमारे १२ हजार नागरिकांचे प्राण वाचवले आहेत. जवानांच्या या कार्याबद्दल लेफ्टनंट जनरल सोनी यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि राज्यातील परिस्थिती संपूर्ण पूर्वपदावर येईपर्यंत, राज्य सरकारची गरज विचारात घेऊन हे मदतकार्य सुरू ठेवले जाणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button