breaking-newsपुणेमहाराष्ट्र

ड्रोन तंत्रज्ञानाची भारतात भरारी

पारंपरिक देखरेखीच्या कामाच्या पलीकडे जाऊन भारतात स्वयंचलित हवाई यंत्रणेचा (ड्रोन) वापर रेल्वे, खाण उद्योग, मनोरंजनासह शेतीपर्यंत अनेक क्षेत्रात केला जात आहे. परिणामी, भारतातील या क्षेत्राने भरारी घेतली असून, २०२१ पर्यंत या क्षेत्राची भारतातील उलाढाल ६ हजार कोटींवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील तीनेक वर्षांत आपल्याला खासगी समारंभांपासून ते सार्वजनिक सोहळ्यांमध्ये अधिकाधिक ड्रोन पाहायला मिळणार आहेत.

बीआयएस रिसर्च या संस्थेच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. अलीकडेच रेल्वे प्रकल्पांच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी रेल्वे मार्गाच्या देखभालीच्या दृष्टीने ड्रोन यंत्रणेचा वापर सुरू केला. त्याशिवाय गेल या कंपनीने पाइपलाइनवर लक्ष ठेवण्यासाठी ही यंत्रणा वापरली आहे. पिकांचे आरोग्य आणि कीटकांच्या प्रादुर्भावाची माहिती घेण्यासाठीही ही यंत्रणा वापरली जाते. कर्नाटक सरकारनेही शेतीचे नुकसान टाळण्यासाठी ड्रोनची मदत घेणार असल्याचे जाहीर केले होते. तर, चित्रपट, मालिकांच्या चित्रीकरणासाठी ड्रोनचा वापर केला जातो. या पाश्र्वभूमीवर, या क्षेत्रात होणारी उलाढाल आणि त्यातून होणाऱ्या रोजगाराच्या संधी या दृष्टीने हा अहवाल महत्त्वाचा आहे.

जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतातील ड्रोन तंत्रज्ञानाच्या वापरात सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. या तंत्रज्ञानाचा २०२१ पर्यंत लष्करी वापरापेक्षा व्यावसायिक वापर वाढणार आहे. त्यामुळे या क्षेत्रातील उलाढालीवरही त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल. भारतात अनेक कंपन्या ड्रोन उत्पादन करत आहेत. तसेच एकाच वेळी अनेक कामे करू शकणाऱ्या ड्रोनची अधिक मागणी आहे. त्यामुळे ड्रोनच्या किमतीही किफायतशीर होत असल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

ड्रोन चालवणे हे कौशल्याचे काम आहे. त्यासाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. मात्र, अद्याप आपल्याकडे त्यासाठीचे रितसर प्रशिक्षण उपलब्ध नाही. अनुभवातूनच काम केले जाते. तरीही, जवळपास रोज दहा ड्रोनचालक तयार होतात. येत्या काळात ड्रोनच्या माध्यमातून व्हच्र्युअल रिअ‍ॅलिटी चित्रीकरणाची सुविधा निर्माण होणार आहे. त्यामुळे या क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत.   – प्रणवकुमार चित्तेहवाई अभियंता-ड्रोन तज्ज्ञ

विवाह समारंभांमध्येही वापर

चित्रपटांच्या चित्रीकरणासह विवाहाचे चित्रीकरण करण्यासाठीही ड्रोन यंत्रणेचा मोठय़ा प्रमाणात वापर केला जातो. ड्रोनचा वापर करून विवाहाचे चित्रीकरण करणे हा प्रतिष्ठेचा भाग झाल्याने, ड्रोन वापरून चित्रीकरण करण्याचा कल वाढला आहे.

ड्रोनच्या वापराबाबतची नियमावली कडक आहे. त्यामुळे कुणालाही सहजगत्या ड्रोन उडवता येत नाही. त्यासाठी पोलीस परवानगी आवश्यक आहे. ड्रोनच्या वापराबाबतचा अर्ज आल्यानंतर त्याचा वापर कशासाठी केला जाणार आहे, याची शहानिशा करूनच परवानगी दिली जाते.    – रवींद्र रसाळसहायक पोलीस आयुक्त (विशेष शाखा)पुणे पोलीस

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button