थर्टीफस्टसाठी पुणेकरांसोबत पोलिसही ‘सज्ज’
नववर्षांचे स्वागतासाठी सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे. पण यातच पुणेकरांनी स्वयंशिस्तीने नियमांचे पालन करून घरातच नववर्षांचे स्वागत करणे आवश्यक आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वतःसह कुटूंबियांची काळजी घेण्याचे आवाहन सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी केले आहे.
शहरात संचारबंदी लागू असल्यामुळे पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्रित फिरता येणार नाही. त्याशिवाय रात्री अकराच्या आतमध्ये हॉटेल, रेस्टॉरंट, बार बंद करण्यात येणार आहेत. त्यामुळे नववर्षांचे स्वागत करताना नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करून नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विनामास्क प्रवास, कोरोना नियमावलीचे उल्लंघन, ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह करणा-याविरूद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. विहीत वेळेनंतरही विनाकारण सार्वजनिक ठिकाणच्या रस्त्यावर येउन नागरिकांनी गर्दी करू नये. अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वरिष्ठ पोलीस अधिका-यांसह कर्मचा-यांचा ६ हजारांवर फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.