breaking-newsताज्या घडामोडीपुणे

कार्यकर्ते हे देखील कोरोना वॉरियर: भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील

पुणे । महाईन्यूज । प्रतिनिधी

कोरोनाच्या लढाईत सामान्य माणसांप्रमाणे राजकीय पक्षाचे आणि गणेशोत्सव मंडळाचे कायकर्ते देखील जगले पाहिजेत. प्रत्यक्ष काम करणा-या केवळ भाजपाच्या कार्यकर्त्यांनाच नाही, तर गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते, पोलीस, डॉक्टर्स, पत्रकारांना नगरसेवक हेमंत रासने यांनी जीवनावश्यक वस्तूंचे किट देऊन सन्मानित केले आहे. कार्यकर्ता हा देखील कोरोना वॉरिअर आहे. तो रस्त्यावर उतरुन गरजूंना किराणा, मास्क वाटतोय. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांनी स्वत: किंवा दानशूरांकडून रस्त्यावरील कार्यकर्त्यांचा आरोग्य विमा काढायला हवा, असे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

नगरसेवक व स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने मित्र परिवारतर्फे बाजीराव रस्त्यावरील सरस्वती मंदिर संस्थेच्या प्रांगणातून कोरोना लढाईत प्रत्यक्ष काम करणा-या भारतीय जनता पक्षाच्या व पुण्यातील १ हजार गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकत्यांसह पोलीस, डॉक्टर्स, पत्रकार असे ३ हजार जणांना टप्याटप्याने जीवनावश्यक वस्तूंचे किट देऊन कार्यकर्ता सन्मान करण्यात आला. यावेळी मुख्य आयोजक श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख व स्थायी समिती अध्यक्ष नगरसेवक हेमंत रासने, महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, राजेश पांडे, राजेश येनपुरे, प्रमोद कोंढरे उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, भारतीय जनता पार्टीने लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्यांना पुण्यामध्ये ८ दिवस पुरेल इतके २ लाख ३० हजार किट दिले आहेत. यंदा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व परिस्थिती लक्षात घेता  गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा. ज्या कार्यकर्त्यांच्या जीवावर गणपती उत्सव चालतो, त्यांचे घर कसे चालेल हे आपण पहायला हवे, असेही त्यांनी सांगितले.

हेमंत रासने म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात योग्य वेळी लॉकडाऊनचा निर्णय घेतला. त्यामुळे कोरोनाचा प्रतिबंध करणे शक्य झाले. या काळात प्रत्येक कार्यकर्ता गरजूंसाठी कार्यरत आहे. विद्यार्थी, प्रवासी, मजूर, हातावर पोट असलेल्यांची उपासमार होऊ नये, यासाठी भाजपाने व गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी काम केले. त्यामुळे या कार्यकर्त्यांचा सन्मान २५ किलो किटमध्ये २५ प्रकारच्या जीवनावश्यक वस्तू देऊन करण्याचा आम्ही संकल्प केला. त्याची सुरुवात झाली असून हे कार्यकर्ता सन्मान किट या कार्यकर्त्यांपर्यंत टप्याटप्याने पोहोचविण्यात येणार आहे. हे कार्यकर्ते गेले ४० हून अधिक दिवस कोरोनासारख्या अदृश्य शक्तीशी लढा देत आहे. त्यामुळे पंतप्रधानांची केलेल्या आवाहनला प्रतिसाद देत आम्ही या कार्यकर्त्यांचा सन्मान करीत त्यांना जीवनावश्यक वस्तू देत आहोत.

मुंबई, पुणे हॉटस्पॉट असताना दारु दुकाने उघडी ठेऊ नयेत : चंद्रकांत पाटील

केवळ पुण्यात नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात सुरु केलेली दारुविक्री ही घातक आहे. नागरिकांनी रस्त्यावर मोठया रांगा लावल्या आहेत. सोशल डिस्टन्सिंग अजिबात पाळले जात नाही. सगळेजण घरामध्ये एकत्र असल्याने यापूर्वीच अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यात दारुच्या बाटल्या घरात आल्या की आणखी अडचणी निर्माण होत आहेत. दारु विक्रीतून मिळणारे उत्पन्न वगैरे गोष्टी बाजूला ठेऊन सामाजिक अडचणी लक्षात घेता, हे बंद करायला हवे. दारु ही जीवनावश्यक गोष्ट नाही. त्यामुळे मुंबई, पुणे हॉटस्पॉट असताना येथे व संपूर्ण महाराष्ट्रात दारुची दुकाने उघडी ठेऊ नये, असे चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button