breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आवास योजनेंतर्गत सर्वांना हक्काचे घर देण्यास सरकार कटीबध्द – केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर

  • च-होली, रावेत आणि बो-हाडेवाडी येथील सदनिकांची संगणकीय सोडत
  • कोरोनामुळे मंत्री जावडेकर यांची कार्यक्रमात ऑनलाईन हजेरी

पिंपरी / महाईन्यूज

गरिबांना सक्षम करण्यासाठी प्रत्येकाला घर, स्वच्छ जल, गॅस, शिक्षण, लसीकरण आदी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे सरकारचे धोरण आहे, असे केंद्रीय पर्यावरण तथा अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत २०२२ पर्यंत सर्वांना स्वतःचे हक्काचे घर देण्यासाठी सरकार कटिबध्द आहे. सर्वसामान्य नागरिकाला केंद्र बिंदू मानून स्थानिक स्वराज्य संस्थांनी काम केल्यास सर्वांचे जीवनमान उंचावणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमार्फत केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राबविण्यात येत असलेल्या च-होली, रावेत आणि बो-हाडेवाडी येथील नियोजित प्रकल्पांतील सदनिकांची संगणकीय सोडत तसेच विविध ठिकाणच्या विकास प्रकल्पांचे ई-भूमिपूजन आणि लोकार्पण केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झाले, त्यावेळी ते बोलत होते.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर उषा उर्फ माई ढोरे होत्या. यावेळी आमदार महेश लांडगे, उपमहापौर केशव घोळवे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, आयुक्त राजेश पाटील, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, शहर सुधारणा समिती सभापती प्रा. सोनाली गव्हाणे, जैव विविधता व व्यवस्थापन समिती सभापती उषा मुंढे, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती उत्तम केंदळे, ब प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, ड प्रभाग अध्यक्ष सागर आंगोळकर, फ प्रभाग अध्यक्ष कुंदन गायकवाड, ग प्रभाग अध्यक्ष बाबसाहेब त्रिभुवन, नगरसदस्या मंगला कदम, झामाबाई बारणे, जयश्री गावडे, सिमा सावळे, आशा धायगुडे-शेंडगे, अनुराधा गोरखे, सुवर्णा बुर्डे, सुनिता तापकीर, निर्मला कुटे, अश्विनी जाधव, नगरसदस्य शैलेश मोरे, संदीप वाघेरे, मोरेश्वर शेडगे, बाबू नायर, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, उल्हास जगताप, शहर अभियंता राजन पाटील, सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, संजय खाबडे, अशोक भालकर, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीलकंठ पोमण, झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभागाचे सक्षम प्राधिकारी तथा सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता देवन्ना गट्टूवार, प्रमोद ओंभासे, नरोना थॉमस, बापू गायकवाड, रवींद्र पवार आदी उपस्थित होते. तर विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, नगरसदस्य नाना काटे, संतोष कोकणे कार्यक्रमासाठी ऑनलाईन उपस्थित होते.

महानगरपालिकेच्या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला चांगल्या सोहळ्याचे साक्षीदार होण्याची संधी मिळाली, पण कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने आयोजित करावा लागला. कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे सर्वांनी कोरोनाचे नियम पाळावे, असे आवाहन करून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत देशातील ग्रामीण भागांमध्ये २ कोटी घरे तर शहरी भागांमध्ये ७० लाख घरे बांधून देण्यात आली आहेत. लाभार्थींना मिळणारी स्वस्त घरे उत्तम असली पाहिजेत. विविध योजनांचा निधी गरिब जनतेच्या जनधन खात्यात थेट जमा होत असून याचा जनतेला विशेष आनंद होत आहे.

उज्वला योजने अंतर्गत देशातील ८ कोटी घरांमध्ये गॅस सिलेंडर पुरविण्यात आले आहेत. कोरोना विषाणू विरुद्ध लढा देण्यासाठी आत्तापर्यंत दीड कोटी जनतेला मोफत लस देण्यात आली आहे. आगामी काळात ६५ वर्षांवरील सर्व तसेच ४५ वर्षांवरील आजारी लोकांना सरकारी रुग्णालय मोफत लस दिली जाणार आहे असे प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. सावित्रीबाई फुले आणि महर्षी कर्वे यांनी स्त्री शिक्षण सुरु केले त्यावेळी त्यांना समाज विरोध सहन करावा लागला. तरीही त्यांनी स्त्री शिक्षणाचा अट्टहास धरला त्यामुळेच आज स्त्रिया सर्व क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करीत आहेत. अशा सावित्रीबाई फुले यांच्या नावाने महापालिकेने स्मारक उभे केले आहे ही अभिमानाची बाब आहे. मोठ्या शहरामध्ये निवांत जागी बसून लेझर शो पाहण्याची सुविधा शहरवासीयांना बर्ड व्हॅली येथे उभारण्यात येणा-या म्युझिक फाऊंटन व लेझर शो प्रकल्पाच्या माध्यमातून मिळणार आहे, असेही प्रकाश जावडेकर म्हणाले.

महापौर उषा उर्फ माई ढोरे म्हणाल्या, सावित्रीबाई फुले यांचे कार्य लक्षात घेवून महानगरपालिकेतर्फे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक उभारण्यात आले आहे. विविध प्रकल्पांच्या माध्यमांतून पिंपरी चिंचवड शहराची ओळख उद्योग नगरी, कामगार नगरी बरोबरच पर्यटन नगरी म्हणून देखील होत आहे.

आमदार महेश लांडगे म्हणाले,  सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून महानगरपालिका काम करीत आली आहे. सर्वसामान्यांसाठी आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून पूर्ण होत आहे हा सर्वसामान्यांसाठी आनंदाचा क्षण आहे. आपल्याला निवडून देणा-या नागरिकांप्रती कर्तव्य बजावण्याची भावना शहरातील सर्व लोकप्रतिनिधींमध्ये आहे असेही ते म्हणाले.

प्रधानमंत्री आवास योजनेची संगणकीय सोडत पारदर्शी असून हा प्रकल्प महानगरपालिकेसाठी अभिमानास्पद आहे. हा प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी कटीबद्ध असल्याचे आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले.

प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत च-होली येथे १४४२, बो-हाडेवाडी येथे १२८८ आणि रावेत येथे ९३४ सदनिका आहेत. या सदनिकांसाठी संगणकीय सोडत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने काढण्यात आली. तसेच सोडतीमध्ये लाभार्थीं ठरलेल्या नागरिकांना संगणकीय सोडत पद्धतीने सदनिकांचे आरक्षण निहाय वाटप देखील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. संगणकीय सोडतीमधील लाभार्थ्यांची यादी महानगरपालिकेच्या https://www.pcmcindia.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

पिंपरी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचे लोकार्पण तसेच बर्ड व्हॅली संगीत व प्रकाशमय कारंजे प्रकल्प, पिंपळे सौदागर ते पिंपरी या दरम्यान नदीवर उभारण्यात येणा-या नवीन समांतर पूलाचे काम आणि वाकड रोड रत्नदीप कॉलनी ते भिंगारे कॉर्नर या रस्त्याच्या सिमेंट कॉंक्रिटिकरण कामाचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते संपन्न झाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी तर सूत्रसंचालन सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी केले. उपमहापौर केशव घोळवे यांनी आभार मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button