breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

तुकोबांच्या पालखी सोहळ्यात “राष्ट्रवादीची प्रचारवारी”

  • दिंडीक-यांच्या भेटवस्तुतही साधली पक्ष प्रचाराची संधी
  • घड्याळाचे चित्र, तिरंगी रंगांच्या छत्र्या केल्या वाटप

 

पिंपरी – विठ्ठलाच्या भक्तीने तल्लीन होऊन संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यातील अखंड वारकरी सांप्रदाय पंढरीच्या दिशेने पाऊल टाकू लागला आहे. वीजांचा कटकडाट अन् ऊन-वारा अंगावर झेलत विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन झालेल्या वारक-यांमुळे वारीचे पावित्र्य कित्येक दशके अबाधित राहिले आहे. वारीच्या पुण्याईचा लाभ घेण्यासाठी अखंड राज्यभरातील सामाजिक संस्था, संघटना, राजकीय पक्षांच्या वतीने भेटवस्तू, भोजन, फराळ, औषधे अशी तत्सम साहित्य मदतीपोटी दिली जातात. मात्र, या समाजसेवेलाही लाजवेल अशा पध्दतीत लाखो वारक-यांचा ताफा असलेल्या तुकोबांच्या पालखी सोहळ्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रचारवारीचा मोका साधून संधीसाधूपणा केला आहे. घड्याळाचे चिन्ह असलेल्या तिरंगी छत्र्या वाटून या राजकीय संतांनी पक्षाचा प्रचार केला आहे. त्यांच्याकडे पाहून तुकोबांच्या पालखी सोहळ्यात “राष्ट्रवादीची प्रचारवारी”च निघाल्याची अनूभुती येत होती.

 

देहू येथील संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा शुक्रवारी (दि. 6) सायंकाळी पाच वाजता निगडी येथील भक्ती-शक्ती चौकात दाखल झाला. न्यायालयाच्या निर्बंधीत आदेशामुळे पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यास पिंपरी-चिंचवड महापालिकेने कुचराई केली. त्यामुळे भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना या राजकीय पक्षांनी लाखो वारक-यांच्या पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यासाठी भक्ती-शक्ती चौकात स्वतंत्र कक्ष उभारून ती परंपरा जपण्याचे कार्य केले. पालखी सोहळ्याचे स्वागत केल्यानंतर वारीतील दिंडीक-यांना भेटवस्तू दिल्या जात होत्या. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सर्वपक्षिय नगरसेवकांच्या वतीने दिंडीक-यांना ताडपत्री वाटप करण्यात येत होती. यामध्ये भक्तीभावाचा वलय वारक-यांना पहायला मिळाला. काही सामाजिक संस्थांकडून वैद्यकीय औषधे, पावसापासून सुरक्षितेसाठी प्लास्टीक कापड, खाऊ आदी वाटप करण्यात आले. तर, काही संस्था, संघटनांनी चहापान, नाष्टा, अल्पोपहाराची व्यवस्था केली होती. दिंडीतील वारकरी या सेवेचा आनंद घेत होते.

 

एकीकडे असे भक्तीभावाचे प्रतिक पहायला मिळत असताना दुसरीकडे मात्र, राष्ट्रवादीच्या व्यासपीठावरून चक्क पक्षाचा प्रचार करत असल्याचे विहंगम दृष्य पहायला मिळत होते. विठुनामाच्या भक्तीसागरात बुडालेल्या वारक-यांना राष्ट्रवादीकडून चक्क पक्षाच्या घड्याळाचे चित्र असलेल्या तिरंगी छत्र्या वाटप करण्यात येत होत्या. वारक-यांनी पावसापासून सुरक्षितेसाठी राष्ट्रवादीच्या सेवेरुपी छत्र्या भक्तीभावाने स्वीकारल्या. वारीच्या दरबारी लोकप्रतिनिधींचा कोणत्याही प्रकारे अवमान होणार नाही, याची वारक-यांनी खबरदारी घेतली. मात्र, पक्षाच्या प्रतिनिधींनी भेट वस्तुंच्या माध्यमातून चक्क पक्षाचा प्रचार केल्याने उलटसुलट चर्चेला उधान आले आहे. पालखी सोहळ्यातील लाखो वारक-यांमध्ये सहभागी होऊन राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांनी चक्क प्रचारवारीच काढली असून ही संतांची वारी नसून “राष्ट्रवादीची प्रचारवारी” असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.

 

भेटवस्तुचा नाठाळपणा पक्षाच्या आंगलट

आजपर्यंत संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे स्वागत पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे केले जात होते. मात्र, न्यायालयाने प्रशासनाला बंधन घातल्यामुळे यावर्षी ही प्रथा मोडीत निघाली. तरीही, वारीतील दिंडीक-यांना भेट वस्तू देण्याची परंपरा टिकविण्यासाठी सर्वपक्षीय नगरसेवकांच्या मानधनातून वस्तू देण्याचा निर्णय घेतला गेला. वस्तू निवडण्याचे सर्वाधिकार पालिकेतील विरोधी पक्षनेते दत्ता साने यांना दिले गेले. त्यावर ताडपत्री भेटवस्तू म्हणून देण्याचा अंतिम निर्णय झाला. ताडपत्री देत असताना राष्ट्रवादीतर्फे पक्षाचा प्रचार करण्यासाठी छत्र्या वाटप करण्यात आल्या. विद्यमान नगरसेवक, विरोधी पक्षनेते, शहराध्यक्षांच्या उपस्थितीत छत्र्या व घड्याळाचे चित्र असलेला रुमाल भेट वस्तू म्हणून देण्यात आले. त्यामुळे राष्ट्रवादीची समाजसेवा पक्षाच्या चांगलीच आंगलट आली आहे. आमच्या हाती पक्षाची रंगबीरंगी छत्री देऊन राष्ट्रवादीने प्रचार करवून घेतल्याची जात असल्याची कुजबूज वारक-यांमध्ये सुरू होती.

 

 

वारक-यांना भेटवस्तू म्हणून देण्यात आलेल्या छत्र्यांवर पक्षाचे चित्र असले तरी, पावसाळ्यात छत्र्या ह्या वारक-यांची गरज आहे. म्हणून त्या वाटप करण्यात आल्या आहेत. विरोधकांना काहीही वाटले तरी त्याचे आम्हाला घेणेदेणे नाही. उलट भक्तीभावाची परंपरा जपत पक्षाने स्वखर्चाने वारक-यांची सेवा केली आहे. वारक-यांनी आमची सेवा स्वीकारली आहे. विरोधकांनी काहीही कंड्या पीटवल्या तरी त्याचे आम्हाला काहीही देणेघेणे नाही.

दत्ता साने, विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादी,  

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button