breaking-newsराष्ट्रिय

तीन राज्यांतील पराभवानंतर.. ‘जीएसटी’ कपातीचा दिलासा

  • सिनेमा तिकीट, टीव्ही संचासह २३ वस्तू स्वस्त

वस्तू आणि सेवा करातून (जीएसटी) अपेक्षेपेक्षा कमी महसूल मिळतो, अशी तक्रार असताना, आणखी २३ वस्तूंवरील जीएसटी दरात कपात करण्याचा निर्णय शनिवारी ‘जीएसटी परिषदे’च्या ३१ व्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे टीव्ही संच, संगणकाचे मॉनिटर्स, सिनेमा तिकीट, पॉवर बँक आदी वस्तू आणि सेवा स्वस्त होणार आहेत.

सर्वाधिक म्हणजे २८ टक्के जीएसटी लागू असलेल्या आणखी सात वस्तूंना १८ टक्क्यांच्या करटप्प्यात आणण्याचा निर्णय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखालील या बैठकीत घेण्यात आला. सुधारित जीएसटी दर १ जानेवारी २०१९ पासून लागू होणार आहेत. त्यामुळे नववर्षांची पहाट काही वस्तूंच्या स्वस्ताईने होईल.

बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेत, जेटली यांनी जीएसटीचा २८ टक्क्यांचा करटप्पा हळूहळू संपुष्टात येत असल्याचे सांगितले. डिजिटल कॅमेरा, मोबाइलच्या पॉवर बँक, व्हिडीओ कॅमेरा रेकॉर्डर्स, व्हिडीओ गेम कन्सोल्स, वाहनांचे ट्रान्समिशन शाफ्ट्स आणि क्रँक्स, गिअर बॉक्स, पुनप्र्रक्रिया केलेले टायर आदी वस्तूंवर आता २८ टक्क्यांऐवजी १८ टक्के जीएसटी लागू होईल. १०० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या सिनेमा तिकिटांवरील जीएसटी २८ वरून १८ टक्के, तर १०० रुपयांपेक्षा कमी मूल्याच्या तिकिटांवरील जीएसटी १८ टक्क्यांवरून १२ टक्के करण्यात आला आहे.

हिंदी पट्टय़ातील तीन राज्यांच्या निवडणुकीतील अपयश आणि पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेऊन केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार तिजोरीवर भार टाकणारे लोकप्रिय निर्णय घेईल, अशी चर्चा सुरू होतीच. शिवाय पंतप्रधान मोदी यांनी गेल्या आठवडय़ात मुंबईत एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, ९९ टक्के वस्तू जीएसटीच्या १८ टक्के अथवा त्यापेक्षा कमी करटप्प्यात आणल्या जातील, असे सूतोवाच केले होते.

जीएसटी दर वाजवी पातळीवर आणणे ही निरंतर सुरू राहणारी प्रक्रिया आहे. यापुढे सीमेंटवरील २८ टक्के जीएसटीही कमी करण्यात येईल, असे संकेत जेटली यांनी दिले. तूर्तास मात्र तसे करता येत नसल्याचे सांगत, सीमेंट आणि वाहनाच्या सुटय़ा भागांवरील जीएसटी कपातीने अनुक्रमे २० हजार कोटी रुपये आणि १३ हजार कोटी रुपयांचे महसुली नुकसान सोसावे लागेल, असे जेटली म्हणाले. सर्वोच्च २८ टक्क्यांच्या करटप्प्यात आता आलिशान मोटारगाडय़ा, वाहनांचे सुटे भाग, मद्य, वातानुकूलन यंत्रे, सीमेंट अशा केवळ २८ वस्तूच राहिल्या आहेत. जीएसटी कपातीतून सरकारला केवळ पाच हजार ५०० कोटी रुपयांचा महसूल गमवावा लागेल, असे जेटली यांनी सांगितले.

जीएसटी परिषदेने अपंग व्यक्तींसाठीच्या व्हीलचेअरचे सुटे आणि पूरक भागांवरील २८ जीएसटी पाच टक्क्यांवर आणला आहे. मालवाहू वाहनांच्या ‘थर्डपार्टी’ मोटार विम्याच्या हप्त्यांवरील कर १८ टक्क्यांवरून १२ टक्क्यांवर आणला आहे. संगमरवरी दगड, नैसर्गिक बूच (कॉर्क), चालण्यासाठीची आधाराची काठी, राखेपासून बनविल्या जाणाऱ्या विटा यांच्यावर आता ५ टक्के जीएसटी आकारला जाईल.

गोठवलेल्या भाज्या जीएसटीमुक्त

  • हवाबंद डब्यात गोठवून ठेवलेल्या ब्रॅण्डेड भाज्या आणि संरक्षित केलेल्या भाज्या (लगेच खाण्यायोग्य नसलेल्या) वरील ५ टक्के जीएसटी रद्द
  • अपंगांच्या व्हिलचेअरसह सर्व वस्तू आणि त्यांचे सुटे भाग यांच्यावर जीएसटी २८ टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर
  • संगमरवर दगडावरील १८ टक्के जीएसटी ५ टक्क्यांवर
  • चालण्यासाठीची आधारकाठी, लाकडी बूच, राखेपासून बनवलेल्या विटांवरील जीएसटी १२ वरून ५ टक्क्यांवर
  • संगीतावरील पुस्तकांचा कर १२ वरून शून्यावर

जीएसटी कमी केलेल्या सेवा

  • १०० रुपयांवरील सिनेमाच्या तिकिटावरील जीएसटी २८ वरून १८ टक्क्यांवर
  • १०० रुपयांपर्यंतच्या सिनेमाच्या तिकिटावरील जीएसटी १८ वरून १२ टक्क्यांवर
  • मालवाहू वाहनाच्या विमा हप्त्यावरील जीएसटी १८ वरून १२ टक्क्यांवर
  • जनधन योजनेतील ठेवींसाठी बँकातर्फे देण्यात येणाऱ्या सेवा जीएसटीमुक्त
  • धार्मिक यात्रांच्या विशेष विमान तिकिटावरील जीएसटी इकॉनॉमी क्लासएवढाच
  • बायोगॅस प्रकल्प, सौरऊर्जेवरील उपकरणे, सौरऊर्जा निर्मिती यंत्रणांवर ५ टक्के जीएसटी. अशा प्रकल्पांसाठी लागणाऱ्या वस्तू आणि सेवांवर पूर्वीप्रमाणेच जीएसटी लागू.

२८ टक्क्यांवरून १८ टक्क्यांवर

  • मॉनिटर आणि ३२ इंचापर्यंतचे दूरचित्रवाणी संच
  • डिजिटल कॅमेरा आणि व्हिडीओ कॅमेरा रेकॉर्डर
  • मोबाइल पॉवर बँक
  • व्हिडीओ गेम नियंत्रक
  • क्रीडा साहित्य
  • वाहनांचे ट्रान्समिशन शाफ्ट, गिअर बॉक्स
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button