breaking-newsराष्ट्रिय

तिने ज्वालामुखीत उतरुन वाचवले पतीचे प्राण

सत्यवानाला सावित्रिने यमराजाच्या तावडीतून सोडवल्याची अख्यायिका आहे. मात्र असाच काहीसा प्रकार कॅरेबियन बेटांवर घडला जेव्हा एका महिलेने ज्वालामुखीमधून आपल्या पतीला सुखरुप बाहेर काढले. ज्वालामुखी पाहताना दोर तुटून ज्वालामुखीत पडलेल्या आपल्या पतीला वाचवण्यासाठी ही महिला जीव धोक्यात टाकत ५० फूट खोल खड्ड्यात उतरली आणि तिने आपल्या पतीला बाहेर काढले.

झालं असं की लग्नानंतर अगदी काहीच दिवसांनी क्ले चास्टौन आणि त्याची पत्नी अकायमी बरोबर मधुचंद्रासाठी कॅरेबियन बेटांवर गेले होते. मूळचे अमेरिकेचे असणारे हे जोडपे साहसी काहीतरी करण्याच्या उद्देशाने कॅरेबियन बेटांवरील सेंट किट्सवर माउंट लिआमुईगा या ठिकाणी गिर्यारोहणासाठी गेले. दोघांनाही साहस करण्याच्या नादात कोणाचीही मदत न घेता, वाटाड्या सोबत न घेता ३ हजार ७०० फूटावरील शिखर गाठण्याचे ठरवले. ठरल्याप्रमाणे ते एकमेकांच्या सोबतीने शिखरावर पोहोचले. तिथे या दोघांना एक मृत ज्वालामुखी दिसला. उत्सुकतेपोटी दोघांनीही दोर लावून ज्वालामुखीत डोकावण्याचे ठरवले. दोघेही हार्नेस आणि क्लिप्सच्या सहाय्याने ज्वालामुखीमध्ये डोकावले मात्र त्याचवेळी क्ले चास्टैनने सुरक्षेसाठी वापरलेली दोरी तुटली आणि तो ५० फूट खोल ज्वालामुखीत पडला.

पती ज्वालामुखीमध्ये पडल्यानंतर अकायमी घाबरली. मात्र त्यावेळी तेथे कोणीच नसल्याने आपल्यालाच आपल्या पतीला वाचवावे लागणार आहे याची तिला जाणीव झाली. अखेर तिने दोरीच्या सहाय्याने खाली उतरण्याचे ठरवले. ‘क्ले खाली पडला तेव्हा त्याला लागल्याने त्याची जोरदार किंकाळी मला ऐकू आली. पण तिथे मदतीला कोणीच नव्हते. मोबाइलही सुरु नव्हता. इतरही कोणती सोय उपलब्ध नव्हती. अखेर मीच क्लेला वाचवण्यासाठी खाली उतरण्याचा निर्णय घेतला,’ असं अकायमीने इंडियाना पोलिसांना सांगितले. अकायमी जेव्हा ज्वालामुखीमध्ये उतरली तेव्हा ज्वालामुखी मृत अवस्थेत असल्याने त्याच्या भिंतीवर बरीच लहान मोठी झाडे आणि वनस्पती असल्याचे तिच्या लक्षात आले. याच झाडांमध्ये क्ले अडकून पडल्याचे तिला दिसले. ‘क्ले एवढ्या वरुन पडूनही शुद्धीवर होता. त्याला जास्त दुखापत झाली नव्हती. मी त्याला आधार देत वर घेऊन आले. त्याच्या नाकाला, पाठीला थोडीफार दुखापत झाली होती आणि एका कानाने त्याला काही काळ ऐकू येत नव्हते,’ अशी माहिती अकायमीने दिली.

ज्वालामुखीमधून पतीला बाहेर काढल्यानंतर अकायमीने त्याला तीन किलोमीटर दूर डोंगराच्या तळाशी असणाऱ्या गावी नेले. तिथे त्यांना इतरांनी मदत केली. अखेर २० लाख रुपये भाडे भरुन मेडिकल चार्टड प्लेनने क्लेला फ्लोरिडा येथे नेण्यात आले. तेथे उपचार केल्यानंतर त्याच्या जीवावरील धोका टळला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

आश्चर्यकारकरित्या क्लेचे कोणतेही हाड तुटले नसून केवळ मुका मार लागला आहे. तो लवकरच बरा होईल असा विश्वास डॉक्टरांनी व्यक्त केला आहे अशी माहिती अकायमीने दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button