breaking-newsपुणे

‘सवाई गंधर्व महोत्सव’ यंदा जागेच्या शोधात

  • ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’कडून रमणबाग प्रशालेचे मैदान देण्यास नकार

पुणे – अभिजात संगीताच्या प्रांतामध्ये जगभरात नावाजलेल्या आणि साडेसहा दशकांची परंपरा लाभलेल्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवासाठी यंदा न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेचे मैदान उपलब्ध होणार नाही. त्यामुळे महोत्सवासाठी नवी जागा शोधण्याची वेळ आर्य संगीत प्रसारक मंडळावर आली आहे.

पर्यायी जागांचा शोध सुरू असून स्थळ निश्चित झाल्यानंतरच यंदाच्या महोत्सवाच्या तारखांची घोषणा करण्यात येणार आहे. मात्र त्यामुळे कानसेनांना यंदा रमणबागेच्या परिसरात रुळलेला हा संगीत जलसा अनुभवायला मिळणार नाही.

डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ात होणाऱ्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाबाबत कलावंत आणि संगीतरसिकांमध्ये कुतूहल असते. ऑक्टोबर महिन्यापासून या महोत्सवाविषयी आकर्षण तयार होते आणि राज्यासह देशभरातून कानसेनांची फौज पुण्यात दाखल होते. मात्र यंदा महोत्सवाच्या गौरवशाली इतिहासात पहिल्यांदाच जागेचा प्रश्न आयोजकांपुढे निर्माण झाला आहे.

गेल्या तीन दशकांपासून न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेच्या मैदानावर हा महोत्सव होत आहे. मात्र, डेक्कन एज्युकेशन सोसायटीने यंदाच्या महोत्सवासाठी रमणबाग प्रशालेचे मैदान उपलब्ध होऊ शकणार नसल्याचे लेखी कळविले आहे. अशा परिस्थितीत महोत्सवाच्या आयोजनापुढे जागेचीच समस्या उभी राहिली आहे, अशी माहिती मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. मंडळातर्फे यंदाच्या महोत्सवाच्या आयोजनासाठी मैदान मिळावे, असे परवानगीचे पत्र दरवर्षीप्रमाणे पाठविण्यात आले होते. मात्र, महोत्सवाच्या तारखांदरम्यान संस्थेतील विद्यार्थ्यांचे क्रीडा प्रशिक्षण वर्ग आणि व्यायाम सत्र दररोज आयोजित करण्यात आले आहे. त्यामुळे मैदान उपलब्ध करून देण्यास असमर्थ असल्याचे संस्थेतर्फे कळविण्यात आले आहे. ऐन वेळी जागा उपलब्ध होणार नसल्याचे समजल्यामुळे यंदा महोत्सवाच्या आयोजनावर परिणाम झाला आहे. आता नव्या जागांचा शोध सुरू करण्यात आला आहे. जागा निश्चित झाल्यानंतर महोत्सवाच्या तारखांची घोषणा करण्यात येईल. यंदाचा महोत्सव नियोजित वेळापत्रकानुसार डिसेंबरमध्येच आयोजित करण्याचा मंडळाचा मानस असल्याचे जोशी यांनी सांगितले.

गेल्या तीन दशकांपासून डेक्कन एज्युकेशन सोसायटी या संस्थेने महोत्सवासाठी सर्वतोपरी सहकार्य केले आहे. त्या संदर्भात संस्थेविषयी मंडळाला कृतज्ञताच आहे, असेही श्रीनिवास जोशी यांनी सांगितले.

‘महोत्सव कुठेही झाला, तरी रसिकांना बससेवा देणार’

अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातील मानिबदू असलेल्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव पुण्यात कुठेही झाला, तरी पीएमपी बसेसची सेवा रसिकांना देणार असल्याचे ‘पीएमपीएमएल’चे संचालक सिद्धार्थ शिरोळे यांनी सांगितले. महोत्सव आणि पीएमपीएमएलचे एक वेगळे नाते आहे. गेली अनेक वर्षे महोत्सवात येणाऱ्या रसिकांसाठी पीएमपी बसेसची सेवा उपलब्ध करून देत असते. यंदाच्या वर्षी महोत्सव कुठेही झाला, तरी आम्ही संगीत रसिकांसाठी पीएमपी बसेसची विशेष सेवा उपलब्ध करून देऊ, असेही सिद्धार्थ शिरोळे यांनी सांगितले.

कारण काय?

आपल्या शाळांची मैदाने यापुढे क्रीडाव्यतिरिक्त कोणत्याही कार्यक्रमांसाठी द्यायची नाहीत, असा ठराव डेक्कन एज्युकेशन संस्थेने यंदा केला. दरवर्षी महोत्सव डिसेंबरमध्ये ज्या काळात भरतो, त्या तारखांदरम्यान संस्थेच्या विद्यार्थ्यांचे क्रीडा प्रशिक्षण वर्ग असल्याने संस्था या महोत्सवासाठी मैदान देऊ शकणार नाही, असे महोत्सवाच्या व्यवस्थापनाला कळविण्यात आले.

पत्र कधी दिले?

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळांतील विद्यार्थ्यांसाठी क्रीडा प्रशिक्षण आयोजित करण्यात आले असल्याने संस्थेच्या शाळांची मैदाने यापुढील काळात क्रीडाव्यतिरिक्त अन्य कार्यक्रमांसाठी भाडय़ाने द्यायची नाहीत, असा ठराव डेक्कन एज्युकेशन संस्थेच्या परिषद आणि नियामक मंडळाने घेतला आहे. याबाबतची माहिती सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या व्यवस्थापनाला एक महिन्यापूर्वी लेखी कळविण्यात आली आहे, असे संस्थेच्या नियामक मंडळ आणि परिषदेचे अध्यक्ष

डॉ. शरद कुंटे यांनी कळविले आहे. मात्र, संस्थेने आर्य संगीत प्रसारक मंडळाला पाठविलेल्या पत्रावर २९ सप्टेंबर २०१८ ही तारीख आहे. त्यामुळे पत्र नेमके कधी दिले, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button