मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना रुग्णालयातून डिस्चार्ज! वर्क फ्रॉम होमचा सल्ला
मुंबई – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अखेर आज सकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर पुत्र आदित्य ठाकरे यांच्यासोबत ते वर्षा या शासकीय निवासस्थानी परतले. आता मुख्यमंत्र्यांना पुढील काही दिवस घरूनच काम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांना मानेचा आणि मणक्याचा त्रास होत होता. एका कार्यक्रमात ते मानेला पट्टा बांधून आल्याचे दिसले होते. हा त्रास वाढल्यामुळे त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित राहणे टाळले होते. तसेच दिवाळीनिमित्त भेटीसाठी आलेल्या मान्यवरांनादेखील ते भेटले नव्हते. त्यानंतर १० नोव्हेंबरला मुख्यमंत्री मुंबईतील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल झाले होते. तेव्हापासून गेले २२ दिवस ते रुग्णालयात होते. १२ नोव्हेंबर रोजी त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. रिलायन्सचे डॉ. अजित देसाई आणि डॉ. शेखर भोजराज यांनी उद्धव ठाकरेंवर शस्त्रक्रिया केली. दरम्यान, आज सकाळी केलेल्या तपासण्यांच्या अहवालानंतर उद्धव ठाकरेंना डिस्चार्ज देण्यात आला.