breaking-newsआंतरराष्टीय

गुरूच्या आकाराएवढे दोन बाह्य़ग्रह शोधण्यात यश

पृथ्वीपासून १५० प्रकाशवर्षे दूर; जीवसृष्टीबाबतच्या संशोधनात मदत

पृथ्वीपासून १५० प्रकाशवर्षे दूर अंतरावर वैज्ञानिकांनी गुरू ग्रहाच्या आकाराएवढे दोन बाह्य़ग्रह शोधून काढले आहेत, सौरमालेत लहान ग्रहांवर जीवसृष्टी शक्य आहे की नाही यावर या संशोधनातून प्रकाश पडणार आहे.

अमेरिकेत रिव्हरसाईड येथील कॅलिफोर्निया विद्यापीठाचे सहायक प्राध्यापक स्टीफन कॅनी यांनी सांगितले की, हे ग्रह गुरू एवढे असून पृथ्वीवरील जीवसृष्टीची वाटचाल या शोधातून समजू शकेल. इतर किती ताऱ्यांभोवती असे गुरूएवढे ग्रह आहेत हे माहिती नसले तरी त्यांच्या वसाहतयोग्यतेबाबत यातून प्रकाश पडू शकतो. या ग्रहांवर महासागराच्या रूपात पाणी असू शकते शिवाय उल्का, धुमकेतू व लघुग्रह यांना त्यांच्या कक्षेतून बाहेर फेकण्याची क्षमताही असावी त्यामुळे तेथून सुटलेले हे घटक इतर लहान ग्रहांवर आदळले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या ग्रहांच्या ताऱ्याभोवती अनेक मोठे ग्रहही सापडले आहेत. असे असले तरी त्यांचा उपयोग आपल्याला सौरमालेच्या रचनेचे आकलन करून घेण्यासाठी फारसा होणार नाही कारण शनी, युरेनस व नेपच्यून हे  सर्व ग्रह सूर्यापासून लांब अंतरावर आहेत. ताऱ्यांपासून दूर अंतरावर असलेले मोठे ग्रह सापडण्याचे प्रमाण अजून कमी आहे. अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल जर्नल या नियतकालिकात याबाबतचा शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे. यात पारंपरिक पद्धतींबरोबर प्रगत तंत्रज्ञानाचा वापर या संशोधनात करण्यात आला आहे. एखादा ग्रह ताऱ्यासमोरून जातो तेव्हा दिसणाऱ्या प्रकाशाच्या फरकातून बाह्य़ग्रहांचा अंदाज केला जातो.

ग्रहाच्या गुरुत्वीय ओढीमुळे ताऱ्यावर परिणाम होतो त्यामुळे तो किंचित थरथरतो त्यामुळे ताऱ्याजवळ ग्रह असल्याचा अंदाज करता येतो. पण संबंधित ग्रह जर ताऱ्यापासून खूप दूर असेल तर गुरुत्वीय परिणाम कमी होऊन तो थरथरण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे मातृताऱ्यापासून लांबचे बाह्य़ ग्रह शोधणे अवघड असते. पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यास एक वर्ष लागते, गुरूला १२ वर्षे, शनीला ३० वर्षे तर नेपच्यूनला १६४ वर्षे लागतात. त्यामुळे लांबचे बाह्य़ग्रह ओळखणे अशाच जास्त कालावधीमुळे अवघड असते. त्यासाठी वैज्ञानिकांचे सगळे आयुष्य अपुरे पडते.

शोधासाठी दोन्ही पद्धतींचा वापर

या संशोधनात ताऱ्याची थरथर व प्रतिमा चित्रण या दोन्ही पद्धतींचा वापर करून गुरूसारखे दोन मोठे बाह्य़ग्रह शोधण्यात आले आहेत. यातून अनेक लहान ग्रह हे वसाहतयोग्य आहेत की नाहीत यावर प्रकाश पडणार आहे. कोटय़वधी मैल अंतरावरील ग्रहांच्या प्रतिमा मिळवणे हे तर सोपे नाहीच पण त्यासाठी ३२ फूट लांबीची संवेदनशील दुर्बीण वापरण्यात आली आहे त्यातही प्रतिमेतील ताऱ्यांचा प्रकाश दूर करून अचूक  प्रतिमा मिळवण्यात आल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button