breaking-newsपुणे

गुरुपौर्णिमेनिमित्त दगडूशेठ दत्तमंदिरातर्फे ‘दान उत्सव’

पुणे: गुरुपौर्णिमेनिमित्त बुधवार पेठेतील कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे दान उत्सव करण्यात आला. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून पुण्यातील ५ सामाजिक संस्थांना एकूण ५०० वह्या आणि ५०० किलो धान्य, बुंदी हे दान उत्सवांतर्गत देण्यात आले. गुरुपौर्णिमेनिमित्त हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यासोबतच कोरोना योद्धे असलेल्या ससूनमध्ये महिला डॉक्टर्स, परिचारिका व स्वच्छता कर्मचा-यांच्या हस्ते दत्तमहाराजांची आरती करण्यात आली.

लॉकडाऊनमुळे मंदिर बंद असल्याने भाविकांनी बाहेरुनच दर्शन घेतले. ट्रस्टतर्फे ५ संस्थांना दिलेली मदत राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प.चारुदत्त आफळे यांच्या हस्ते देण्यात आली. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार, कार्यकारी विश्वस्त युवराज गाडवे, उत्सवप्रमुख शिरीष मोहिते, नंदकुमार सुतार, विश्वस्त अ‍ॅड.एन.डी.पाटील, उल्हास कदम, चंद्रशेखर हलवाई आदी उपस्थित होते.ट्रस्टचे माजी अध्यक्ष अंकुश काकडे यांच्या हस्ते सपत्नीक लघुरुद्र झाला. तर, गुडविल इंडिया उपक्रमाचे कालिदास मोरे यांच्या हस्ते दत्तयाग पार पडला. आपलं घरं, बचपन वर्ल्ड फोरम, एकलव्य न्यास, माहेर, संतुलन पाषाण या पाच संस्थांना गुरुपौर्णिमेनिमित्त मदत देण्यात आली.ह.भ.प.चारुदत्त आफळे म्हणाले, गुरुपौर्णिमा उत्सवांतर्गत साजरा केलेला दान उत्सव हे भक्तीचे वेगळे स्वरुप आहे. कीर्तन भक्ती, पादसेवन भक्ती, श्रवण भक्ती प्रमाणे दत्तमंदिराने समाजातील एका वेगळ्या घटकाची दान उत्सवातून केलेली ही भक्ती आहे. धार्मिक कार्यक्रमांसोबतच सामाजिकतेचे भान हे प्रत्येक मंदिराचे कर्तव्य आहे. मंदिरे ही केवळ धार्मिक वास्तू न राहता समाजहिताचे काम करणारी मंदिरे व्हायला हवीत. त्यामुळे समाजाने दिलेला पैसा ख-या अर्थाने समाजातील गरजूंपर्यंत पोहोचेल, यात शंका नाही.ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे उत्सवाचे स्वरूप पूर्ण बदलले आहे. किमान धार्मिक कार्यक्रम करून महाप्रसादही रद्द करण्यात आला. त्याऐवजी पाच अनाथालयांना व वृद्धाश्रमांना पाचशे किलो धान्य आणि विद्यार्थ्यांना पाचशे वह्यांचे वाटप केले गेले. भाविकांनाही लांबूनच दर्शन व्हावे यासाठी मोठा एलईडी स्क्रीन लावण्यात आला होता व प्रसादच्या बुंदी पाकिटांचे वाटप करण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button