breaking-newsपुणेमहाराष्ट्र

गुंडांना धाक बसवणारी पथके बरखास्तीच्या मार्गावर

गुंडांना मोकळे रान; उद्या अंतिम निर्णय

वाहनांची  तोडफोड , वैमनस्यातून होणाऱ्या मारामाऱ्या, सामान्यांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या घटना वाढीस लागल्या असतानाच पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेतील महत्त्वाची तपास पथके बरखास्त करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. गुंडांना धाक बसविणारे संघटित गुन्हेगारी विरोधी पथक तसेच दरोडा प्रतिबंधक पथकाचा त्यात समावेश आहे. ही पथके बरखास्तीच्या मार्गावर असल्याने या पथकातील पोलिसांच्या मनोबलावर परिणाम झाला आहे तसेच गुंडांना धाक बसविणारी पथके बंद पडल्यानंतर गुंडांना मोकळे रान मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची (क्राइम ब्रँच) पुनर्रचना करण्याचा निर्णय पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी घेतला आहे. गुन्हे शाखेची पुनर्रचना झाल्यानंतर पाच पथके बरखास्त होण्याची शक्यता आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या रचनेत युनिट १, युनिट २, युनिट ३, युनिट ४, युनिट ५ तसेच दरोडा प्रतिबंधक पथक, खंडणीविरोधी पथक, होमिसाइड पथक, प्रॉपर्टी सेल, सामाजिक सुरक्षा विभाग, संघटित गुन्हेगारीविरोधी पथकाची दोन पथके (गुंडा स्क्वाड), वाहन चोरीविरोधी पथक अशी तेरा पथके आहेत. गुन्हे शाखेत काही महत्त्वाचे फेरबदल करण्याच्या दृष्टीने गेल्या काही दिवसांपासून पोलीस आयुक्त वेंकटेशम यांनी हालचाली सुरू केल्या होत्या. त्यानुसार गुन्हे शाखेची पुनर्रचना करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्त डॉ. वेंकटेशम यांनी मांडला असून याबाबत बुधवारी अंतिम निर्णय होणार आहे. गुन्हे शाखेतील दरोडा प्रतिबंधक पथक, होमिसाइड पथक, प्रॉपर्टी सेल, वाहन चोरीविरोधी पथक, संघटित गुन्हेगारीविरोधी पथक बरखास्त करून पुनर्रचना करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

बरखास्त करण्यात आलेल्या पथकातील पोलिसांना सध्या अस्तिवात असलेल्या युनिट १, युनिट २, युनिट ३, युनिट ४, युनिट ५ तसेच खंडणीविरोधी पथकात सामावून घेतले जाणार आहे. पोलीस आयुक्तांनी गुन्हे शाखेतील पथकांच्या कामगिरीचे म्हणजेच गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण विचारात घेऊन गुन्हे शाखेतील दरोडा प्रतिबंधक पथक, संघटित गुन्हेगारी विरोधी पथकाची दोन पथके तसेच अन्य पथके बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. दरोडा प्रतिबंधक पथक, संघटित गुन्हेगारी विरोधी पथकाच्या माध्यमातून शहारातील गुंड, चोरटे, बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येते. सराईत गुन्हेगारांना चौकशीकामी बोलावण्यात येते. त्यामुळे गुंडांना धाक बसतो. मात्र, गुंडांना धाक बसविणारी पथके बंद होण्याच्या मार्गावर असल्याने पोलिसांच्या मनोबलावर परिणाम झाला आहे, अशी माहिती गुन्हे शाखेतील सूत्रांनी दिली.

वाहनचोरीच्या घटना वाढल्या

शहरात वाहनचोरीच्या घटना वाढल्या आहेत. किमान दोन ते तीन दुचाकी वाहने शहरातून दररोज चोरीला जात आहेत. गुन्हे शाखेतील वाहनचोरी विरोधी पथक देखील नव्या पुनर्रचनेत बरखास्त केले जाणार आहे. बरखास्त करण्यात आलेल्या पथकातील कर्मचाऱ्यांना सध्या अस्तिवात असलेल्या पथकात सामावून घेतले जाणार असले तरी या पथकात त्यांचे स्थान दुय्यम राहणार आहे. त्यामुळे गुन्हे शाखेतील कर्मचाऱ्यांमध्ये कुरबुरी देखील होण्याची शक्यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button